रांची : बीसीसीआयने नव्या मोसमासाठीच्या कॉण्ट्रॅक्ट यादीतून महेंद्रसिंह धोनीला वगळलं असलं तरी भारताच्या माजी कर्णधाराच्या दैनंदिन जीवनात त्यामुळे फरक पडलेला नाही. धोनी सध्या झारखंड रणजी संघाच्या नेट्समध्ये कसून सराव करत आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिलेल्या माहितीनुसार टी-20 विश्वचषक हे धोनीचं लक्ष्य आहे. आणि त्यादृष्टीनेच भारतीय संघात पुनरागमनाचा त्याचा प्रयत्न आहे. तर दुसऱ्या बाजूला अशी चर्चा आहे की, धोनी आयपीएलसाठी सराव करतोय. मार्च महिन्याच्या अखेरीस आयपीएलला सुरुवात होणार आहे. त्यामुळे धोनीकडे सरावासाठी अवघे दोन महिनेच आहेत. त्यामुळे धोनी नेट्समध्ये कसून सराव करत आहे.
38 वर्षीय धोनी सध्या झारखंडच्या संघासोबत सराव करत आहे. झारखंडच्या संघातील सूत्रांनी सांगितले की, धोनी आजपासून टीममधील खेळाडूंसोबत सराव करणार आहे, ही बाब संघव्यवस्थापनाने सांगितली नव्हती. अचानक धोनीला मैदानात पाहून झारखंडच्या खेळाडूंना आणि त्याच्या चाहत्यांना सूखद धक्का बसला. झारखंडचा संघ रविवारी उत्तराखंडसोबतच्या रणजी सामन्याची सध्या तयारी करत आहे.
धोनी कसोटी क्रिकेटमधून 2014 सालीच निवृत्त झाला आहे. सध्या तो केवळ एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांमध्येच भारताचं प्रतिनिधित्व करत होता. इंग्लंडमधल्या विश्वचषकानंतर (जूलै) धोनीने एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांमधून सातत्याने माघार घेतली किंवा त्याला खेळवण्यात आलेलं नाही. त्यामुळे आता बीसीसीआयने धोनीला कॉन्ट्रॅक्ट देण्याचं टाळून, त्याला वेळीच निवृत्त होण्याचे संकेत दिले असल्याचे बोलले जात आहे. परंतु धोनी सरा करण्यासाठी मैदानात परतल्यामुळे सध्या तरी त्याचा निवृत्तीचा विचार नसल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, बीसीसीआयनं आगामी मोसमासाठी जाहीर केलेल्या कॉण्ट्रॅक्ट यादीत कर्णधार विराट कोहली, एकदिवसीय उपकर्णधार रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या तीन शिलेदारांचा ए प्लस श्रेणीत समावेश केला आहे. या सर्वोच्च श्रेणीतल्या खेळाडूंना सात कोटी रुपयांचं वार्षिक मानधन देण्यात येईल.
बीसीसीआयने ए श्रेणीत अकरा खेळाडूंचा समावेश केला असून, त्यांना पाच कोटी रुपयांचं वार्षिक मानधन देण्यात येईल. या यादीत कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, के. एल. राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव आणि ऋषभ पंतचा समावेश आहे.