नॉर्थ साऊण्ड (वेस्ट इंडीज) :  वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वन डे सामन्यात विराट कोहलीच्या टीम इंडियाला 11 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

या विजयासह वेस्ट इंडिजनं स्पर्धेतील आपलं आव्हान कायम ठेवलं आहे.

तळाच्या फजंदाजांची उडालेली तारांबळ आणि महेंद्रसिंग धोनीची संथ खेळी यामुळे भारताला 190 धावांचं माफक लक्ष्यही गाठता आलं नाही. अखेरच्या षटकांमध्ये विजयासाठी अवघ्या काही धावा शिल्लक असताना भारताचा एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरु शकला नाही. भारत 178 धावांवर सर्वबाद झाला.

धोनी टीकेचा धनी

अत्यंत संथ खेळीमुळे महेंद्रसिंह धोनी सध्या टीकेचा धनी बनला आहे.  धोनीने 114 चेंडूत 54 धावा केल्या.  यामध्ये केवळ एका चौकाराचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे धोनीने आपला हा एकमेव चौकार 103 चेंडूनंतर मारला.

इतके चेंडू वाया घालवूनही धोनी मॅच जिंकून देईल अशी आशा होती, मात्र तो शेवटच्या षटकाच्या आधीच बाद झाला.

धोनीची सर्वात संथ अर्धशतक

मॅचविनिंग खेळीसाठी प्रसिद्ध असलेल्या धोनीने कालच्या सामन्यात अर्धशतक पूर्ण करण्यासाठी तब्बल 108 चेंडू खेळले. भारतीय खेळाडूने केलेलं हे दुसरं सर्वात संथ अर्धशतक आहे.

यापूर्वी सदागोपन रमेशने 1999 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 200 चेंडूत 82 धावा केल्या होत्या. 

याशिवाय माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही एका सामन्यात 105 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं.