नागपूरच्या सुगतनगरमधील आरमोर्स टाऊनशिपमध्ये हायटेन्शन वायरचा शॉक बसून पियुष आणि प्रियांश धर या 11 वर्षांच्या जुळ्या भावंडांचा मृत्यू झाला होता. टाऊनशिप तयार झाली, तेव्हा तिथून हायटेन्शन वायर गेली होती. तरी तिथल्या बांधकामाकडे दुर्लक्ष केल्याच्या आणि बिल्डरला मदत केल्याच्या आरोपातून दोघांना अटक झाली. बिल्डर आनंद खोब्रागडे यांना आधीच अटक झाली होती.
12 वर्षांपूर्वी म्हणजेच 2005 च्या सुमारास ही टाऊनशिप तयार झाली होती. मात्र महापालिकेच्या दोन्ही अधिकाऱ्यांनी तेव्हा केलेल्या दुर्लक्षासाठी त्यांना आता जबाबदार मानून कारवाई झाली आहे. यापैकी एक आरोपी 52 वर्षांचा तर दुसरा 57 वर्षांचा आहे. मात्र तेव्हा केलेल्या भ्रष्ट कारभाराची फळं नशिबी आली हे विशेष.
काय आहे प्रकरण ?
31 मे रोजी सुगतनगर मधील आरमोर्स कॉलनीत आपल्या रो हाऊसच्या बाल्कनीत प्रियांश आणि पियुष ही 11 वर्षांची जुळी भावंडं क्रिकेट खेळत होती. त्यावेळी झाडात अडकलेला प्लॅस्टिकचा बॉल काढताना दोन्ही भावांना विजेचा शॉक लागला होता.
दोघंही भाऊ शॉकमुळे भाजले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 8 जून रोजी एका भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर 20 जून रोजी दुसऱ्या भावानेही प्राण सोडले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं महावितरणसह 6 संस्थांना नोटीस बजावली आहे. खंडपीठानं हायटेन्शन वायरमुळे 10 दिवसात 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी स्पष्टीकरण मागितलं होतं. 10 दिवसात तीन बालकांच्या मृत्यूच्या प्रकरणी उच्च न्यायालयाने दखल घेतली होती.
नागपूरमध्ये 10 दिवसात हायटेन्शन वायरमुळे दोन जुळ्या भावंडांचा आणि त्यानंतर आणखी एका चिमुरड्याचा मृत्यू झाला होता. यानंतर हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं महावितरण, महापारेषण, महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, नगर विकास विभाग, ऊर्जा विभाग यांना नोटीस बजावली होती.