लखनऊ : रायबरेलीमध्ये राहणाऱ्या गँगरेप पीडितेवर लखनऊमध्ये अॅसिड हल्ला झाला. रायबरेलीमध्ये पीडितेवर सामूहिक बलात्कार झाला होता आणि त्यानंतर तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.


पीडित महिला गेल्या एक वर्षापासून अलीगंजच्या हॉस्टेलमध्ये राहत होती. हॉस्टेलच्या सुरक्षारक्षकाच्या रुमजवळ नळावर पाणी भरण्यासाठी पीडित महिला गेली असताना तिच्यावर अॅसिड हल्ला झाला.

अॅसिड हल्ला झाल्यानंतर महिलेने जोरजोरात आरडाओरडा केला. त्यानंतर हॉस्टेलचा सुरक्षारक्षक धावत बाहेर आला आणि महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र, हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाला होता.

पोलिसांनी या अॅसिड हल्ल्याचा तपास सुरु केला आहे. हॉस्टेलच्या सुरक्षारक्षकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हॉस्टेलच्या परिसरात कुणीच येऊ शकत नाही. मात्र, महिलेवर अॅसिड हल्ला झाल्यानंतर आजूबाजूला हल्लेखोरांना शोधण्याचा प्रयत्न केला. पण कुणीच दिसला नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच लखनऊकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये काही गुंडांनी पीडितेला अॅसिड पाजण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर त्या पीडितेला भेटण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही हॉस्पिटलमध्ये गेले होते. एकंदरीत उत्तर प्रदेशात अॅसिड हल्ल्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे.