मुंबई : हाथरसप्रकरणावरुन संपूर्ण देश ढवळून निघालाय एकीकडे ते सुरुच असताना आयपीएलच्या मैदानात कोलकात्याविरुद्धचा सामना हरल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीसोबत विचित्र प्रकार घडलाय. एका ट्रोलरनं थेट धोनीच्या पत्नीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कमेंट करत त्याच्या 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली आहे. त्यावरुन अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगमा यांनी पंतप्रधान मोदींना सवाल केलाय. तर शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्रोलर्सच्या या विकृत मानसिकतेकडे केंद्र सरकारनं लक्ष देण्याची गरज असल्याचं म्हटलंय.


कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जला 10 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा सामन्यात फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. या सामन्यात धोनीला 12 बॉलमध्ये 11 धावा करता आल्या. त्यामुळे धोनीवर सातत्याने टीका केली जात आहे. परंतु काहींनी कळस गाठत धोनीची चिमुकली झिवा हिच्यावर बलात्काराची धमकी दिली.



बोबड्या बोलीत धोनीच्या लेकीचं मस्त गाणं


भारतीय क्रिकेट संघातील 'कॅप्टन कूल' नावाने ओळखला जाणारा क्रिकेटपटू म्हणजे धोनी. धोनीचे जगभरात मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत. त्याच प्रमाणाचे धोनीची मुलगी झिवादेखील सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. धोनी सतत झिवासोबतचे फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत असतो.


धोनी फलंदाजीत संघाला विजय मिळवून देण्यात अयशस्वी ठरला. केकेआरने या सामन्यात जिंकण्यासाठी चेन्नईसमोर 168 धावांचं आव्हान ठेवलं होतं. केकेआरच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या सीएसकेने मात्र 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावत 157 धावा केल्या. शेवटी संघाला 10 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. हा चेन्नईचा यंदाच्या आयपीएलधील सहा सामन्यांपैकी चौथा पराभव होता.