दुबई : आशिया चषकाच्या सुपर फोर साखळीत भारत आणि अफगाणिस्तानचा सामना आज पार पडत आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार असघर अफगाणनं नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी स्वीकारली आहे. सामन्यात भारताच्या कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंह धोनीच्या खांद्यावर आहे.

Continues below advertisement


कर्णधार रोहित शर्मानं या सामन्यातून विश्रांती घेतली असून, त्याच्या अनुपस्थितीत टीम इंडियाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी धोनीवर सोपवण्यात आली आहे. कर्णधार म्हणून हा धोनीचा 200वा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना आहे. शिखर धवन, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार आणि यजुवेंद्र चहल या प्रमुख शिलेदारांनाही या सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे.


लोकेश राहुल, मनीष पांडे, खलील अहमद, सिद्धार्थ कौल आणि दीपक चहार यांना या सामन्यात खेळण्याची संधी देण्यात आली आहे.


टीम इंडियांचं आशिया चषकाच्या फायनलचं तिकीट कन्फर्म झालं आहे. फायनलमध्ये खेळण्याआधी भारतीय संघाला आज सुपर फोर सामन्यात अफगाणिस्तानशी दोन हात करण्याची संधी मिळणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यात आपली मधली फळी निरखून पाहण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल.


आशिया चषकात भारतानं सलग चार सामने जिंकण्याचा पराक्रम गाजवला. या चारही सामन्यांमध्ये भारताच्या सलामीच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी सातत्यपूर्ण कामगिरी बजावली.


अफगाणिस्तानला हलक्यावर घेऊन चालणार नाही. कारण या स्पर्धेत अफगाणिस्तानने श्रीलंका आणि बांगलादेशला चांगलेच दणके दिले. त्यामुळे अफगाणिस्तानचा संघही धोकादायक ठरला आहे. या मालिकेचा शेवट विजयाने करण्याचं ध्येय अफगाणिस्तानचं असेल.