IPL 2020 : आयपीएलचा तीन वेळचा चॅम्पियन संघ चेन्नई सुपरकिंग्स या हंगामात संघर्ष करत आहे. या कामगिरीमुळं कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर टीका देखील झाली. धोनीवर टीका करताना युवा खेळांडूवर विश्वास नसल्याची देखील चर्चा केली गेली. मात्र कालच्या सामन्यात धोनीनं युवा खेळाडूंना संधी दिली. यात ऋतुराज गायकवाड, नारायण जगदीशन यांच्याशिवाय आणखी एक नाव होतं ते म्हणजे मोनू कुमार. 25 वर्षीय या युवा खेळाडूला दोन वर्षात काल पहिल्यांदा संधी मिळाली.
मोनू कुमारला धोनीने शार्दुल ठाकूरच्या जागी प्लेइंग इलेव्हन मध्ये सहभागी केलं. मोनू कुमार 2018 मध्ये चेन्नई सुपरकिंग्सचा भाग झाला आहे. तो रांचीचा असून याआधीही धोनीसोबत काही टूर्नामेंटमध्ये खेळला आहे. मात्र त्याला आयपीएलमध्ये मात्र 43 सामन्यानंतर काल संधी मिळाली. या सामन्यात त्याने 2 षटकात 20 धावा दिल्या. तसंच त्याला विकेटही घेता आली नाही. इतक्या उशीराने संधी मिळालेला मोनू कुमार गुगलवर ट्रेंड होतोय. त्याला फॅन्सकडून धोनीची पत्नी साक्षीचा असिस्टंट असं चिडवलं देखील गेलं होतं. काल त्याने डेब्यू केल्यानंतर त्याचं नाव ट्रेंड झालं.
चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा संघ फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही. रविवारी सीएसकेने आरसीबीला 8 विकेट्सनी मात दिली. परंतु, चेन्नईला मिळालेला हा विजय संघाला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यासाठी पुरेसा नव्हता. रविवारच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्स विरोधात विजय मिळवला. त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचं चेन्नईचं आव्हान संपुष्टात आलं. त्यामुळे धोनीच्या नेतृत्त्वात खेळणारा चेन्नईचा संघ आयपीएलच्या 13 व्या सीझनमध्ये प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेलेला पहिला संघ आहे.
आयपीएलमध्ये चेन्नईने एकूण 12 सामने खेळले असून त्यापैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 8 सामन्यांमध्ये चेन्नईचा पराभव झाला आहे. आता जर धोनीच्या संघाने बाकी असलेल्या दोन सामन्यांमध्येही विजय मिळवला, तरिदेखील चेन्नईच्या संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची कोणतीही संधी नाही.
चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने मुंबई इंडियन्स विरोधातील सामन्यांतच मान्य केलं होतं की, आता सीएसकेचा संघ यंदाच्या सीझनमध्ये प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकणार नाही. दरम्यान, आतापर्यंतच्या आयपीएलच्या सर्व सीझनपैकी यंदा पहिल्यांदाच सीएसकेचा संघ प्लेऑफमध्येही जागा निर्माण करू शकणार नाही.
चेन्नईचा युवा गोलंदाज मोनू कुमारला दोन वर्षांनी संधी, का होतेय त्याची ट्रेंडिंगमध्ये चर्चा?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Oct 2020 03:30 PM (IST)
मोनू कुमारला धोनीने शार्दुल ठाकूरच्या जागी प्लेइंग इलेव्हन मध्ये सहभागी केलं. मोनू कुमार 2018 मध्ये चेन्नई सुपरकिंग्सचा भाग झाला आहे.
उशीराने संधी मिळालेला मोनू कुमार गुगलवर ट्रेंड होतोय. काल त्याने डेब्यू केल्यानंतर त्याचं नाव ट्रेंड झालं.
NEXT
PREV
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -