मुंबई : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या पत्नीने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शमीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप पत्नी हसीन जहाने केला आहे. तसेच शमीच्या पर्सनल चॅटचे स्क्रीनशॉटही तिने फेसबुकवर शेअर केले होते. त्यानंतर आता पहिल्यादांच मोहम्मद शमीची प्रतिक्रिया आली आहे.

हसीन जहांने मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून फेसबुकवर 11 खळबळजनक पोस्ट केल्या. शमीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही तिने केला आहे.

शमीने आपल्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवरुन त्याने याबाबत आपलं म्हणणं मांडलं आहे. 'हाय मी मोहम्मद शमी, या ज्या काही बातम्या आमच्या खासगी आयुष्याबाबत येत आहेत त्या सर्व खोट्या आहेत. माझ्याविरुद्ध हा खूप मोठा कट आहे. मला बदनाम करण्यासाठी आणि माझा गेम खराब करण्याचा हा प्रयत्न आहे.'


या ट्वीटमध्ये शमीचं उत्तर देण्याचा अंदाज आणि ट्वीट करण्याची पद्धत पाहिली तर ती वेगळी दिसून येईल. हा ट्वीट पाहून असं लक्षात येतं की, हा ट्वीट स्वत: शमीने केलेलं नसावं. कारण की, शमीचे जुने ट्वीट पाहता या ट्वीटची भाषाही थोडी वेगळी वाटते.

दरम्यान, मोहम्मद शमीच्या पत्नीने हसीन जहांने शेअर केलेले फोटो आणि पोस्ट आता काही वेळापूर्वीच डिलीट करण्यात आलं आहे. फेसबुकवरील तिचं अकाऊंटही सध्या दिसत नाही. त्यामुळे तिचं अकाउंटच डिलीट करण्यात आलं असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.



अनेक तरुणींशी शमीचे अनैतिक संबंध, पत्नीचा फेसबुकवर आरोप

शमीच्या पत्नीने पोस्ट केलेल्या स्क्रीनशॉट्समध्ये काही महिलांचे फोटो आणि अश्लील चॅट दिसत आहेत. यापैकी कोणत्याही चॅटमध्ये शमीची ओळख पटत नाही. मात्र 'एबीपी आनंदो'च्या पत्रकार राजर्षी दत्ता गुप्ता यांनी हसीन जहांशी संपर्क साधला असता हे फेसबुक अकाऊण्ट आपलंच असल्याचं त्यांनी सांगितलं.

27 वर्षीय मोहम्मद शमीचं लग्न 2014 मध्ये झालं होतं. त्यांना आयरा ही मुलगी आहे.

पोस्टमध्ये कोणाचा उल्लेख?

हसीन जहांने नागपूर आणि पाकिस्तानातील काही महिलांचा उल्लेख केला आहे. फेसबुक पोस्टमध्ये संबंधित महिलांची नावं स्पष्ट दिसत आहेत. एका फोटोमध्ये तर सांबामध्ये राहणारी एक महिला शमीची गर्लफ्रेण्ड असल्याचा दावाही हसीन जहांने केला आहे.

एक तरुणी 'आय मिस यू' असा मेसेज शमीला करते, त्यावर 'कम टू माय रुम' असा रिप्लाय तो करताना दिसत आहे.



हसीन जहांचे आरोप

मोहम्मद शमी आणि त्याच्या कुटुंबीयांवर हसीन जहांने अनेक गंभीर आरोप केले आहेत. शमीने सातत्याने आपला शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचं ती सांगते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरुन परतल्यानंतरही त्याने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप तिने केला. शमी आणि त्याच्या कुटुंबाने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही दावा हसीन जहांने केला.

'शमी अनेक महिलांसोबत अश्लील चॅट करायचा. जेव्हा त्याचा फोन माझ्या हाती लागला, तेव्हा तो 'लॉक' होता. मात्र वेगवेगळे पॅटर्न्स वापरल्यावर अखेर फोन अनलॉक झाला. अखेर मला या गोष्टींचा उलगडा झाला. शमीचे सगळे कॉल डिटेल्स आणि स्क्रीनशॉट्स माझ्या हाती लागले. आपला फोन गायब झाल्याचं समजताच तो चांगलाच भडकला होता.' असंही हसीन जहांने 'एबीपी'शी बोलताना सांगितलं.

फेसबुक वॉलवरुन या पोस्ट डीलीट कराव्यात, यासाठी आपल्यावर दबाव टाकला जात असल्याचंही हसीन जहांने सांगितलं.

8 जानेवारीला काय झालं?

'उत्तर प्रदेशमध्ये मला मारहाण केली जायची. माझं मानसिक आणि शारीरिक शोषण व्हायचं. शमीचं पूर्ण कुटुंब मला शिवीगाळ करत असे. सूर्योदयापासून रात्री दोन-तीन वाजेपर्यंत हा प्रकार चालायचा', असं तिने सांगितलं.

जाधवपूर पोलिसात हिंसाचाराची माहिती दिली. 'कदाचित त्याच्या कुटुंबाने माझी हत्याही केली असती. त्यांनी माझा जीव घेण्याचा प्रयत्नही केला' असं हसीन जहां सांगते.

'मी अजूनही पोलिसात तक्रार दिलेली नाही. 8 जानेवारीला उत्तर प्रदेशमध्ये मी घरगुती हिसांचाराची बळी पडले. त्यानंतर मी कोलकात्याला गेले आणि स्थानिक पोलिसात माहिती दिली. अद्यापही कायदेशीर कारवाईबाबत मी विचार करत आहे' अशी माहिती हसीन जहांने दिली.

संंबंधित बातम्या :

मोहम्मद शमीवरील आरोपांवर बीसीसीआयची प्रतिक्रिया

अनेक तरुणींशी शमीचे अनैतिक संबंध, पत्नीचा फेसबुकवर आरोप