मुंबई : बॉल टॅम्परिंगप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांची आयपीएलमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता ऑस्ट्रेलियाचा आणखी एक खेळाडू आयपीएलमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे.


दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या कसोटीआधी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, स्टार्कची दुखापत गंभीर असल्याने तो आयपीएलमध्ये खेळू शकेल की नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.

cricket.com.auच्या वृत्तानुसार, मिचल स्टार्कच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. ज्यामुळे द. आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या कसोटीतून त्याला वगळण्यात आलं आहे. त्याच्या जागी युवा वेगवान गोलंदाज चॅड सेयर्सला स्थान देण्यात आलं आहे.

या दुखापतीमुळे स्टार्क यंदाच्या आयपीएल मोसमात खेळण्याची शक्यता कमी आहे. द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीनंतर स्टार्क दुखापतीवरील उपचारासाठी मायदेशी परतणार आहे.

जर स्टार्कची दुखापत आणखी बळावली तर तो आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही. त्यामुळे केकेआरला मोठा धक्का बसू शकतो. केकेआरने 9.4 कोटींमध्ये मिचेल स्टार्कला खरेदी केलं आहे. पण सध्या तरी त्याच्या सहभागाबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, यंदा केकेआरने गौतम गंभीरऐवजी दिनेश कार्तिकवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपावली आहे. पण जर स्टार्क या मोसमात खेळू शकला नाही तर कोलकाताच्या अडचणी बऱ्याच वाढू शकतात.

केकेआरचा पहिला सामना 8 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसोबत होणार आहे.