मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने बॉल टॅम्परिंगप्रकरणात अतिशय संवेदनशील पण तितकंच प्रगल्भ ट्विट केलं आहे.

बॉल टॅम्परिंगप्रकरणात दोषी आढळेलल्या ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरुन बॅनक्रॉफ्ट यांना एक खंत घेऊनच जगायचं आहे. मात्र आपण एक पाऊल मागे घेऊन, त्यांना त्यांचा वेळ द्यावा, अशा आशयाचं ट्विट सचिनने केलं आहे.

तेंडुलकर म्हणाला, “त्यांना त्यांच्या कृत्याचा पश्चाताप होतोय. आता त्यांना त्या कृत्याच्या परिणामांसह आयुष्य काढायचं आहे. पण त्यांच्या कुटुंबीयांचा विचार करा. कारण ते परिणाम खेळाडूंसह कुटुंबीयांनाही भोगावे लागणार आहेत. त्यामुळे आता आपण एक पाऊल मागे येऊ आणि त्यांना थोडा वेळ देऊ”


स्मिथ ढसाढसा रडला

बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर स्टीव्ह स्मिथ पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आला. आपली चूक झाली हे मान्य करताना तो पत्रकार परिषदेत ढसाढसा रडला. डनीमध्ये पोहोचल्यानंतर त्याने पत्रकार परिषद घेतली आणि आपली चूक झाली, हे मान्य केलं.

''मला माफ करा. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून मी झाल्या प्रकाराची सर्व जबाबदारी स्वीकारतो. बॉल टॅम्परिंग माझी घोडचूक होती,'' अशी कबुली स्मिथने दिली.


बॉल टॅम्परिंगप्रकरणी तीन जण दोषी

बॉल टॅम्परिंग प्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरुन बॅनक्रॉफ्ट हे तिघे दोषी आढळले आहेत. स्मिथ आणि वॉर्नरवर ऑस्ट्रेलियाने 1-1 वर्षाची बंदी घातली आहे. तर बॅनक्रॉफ्ट 9 महिने संघाबाहेर असेल.

काय आहे प्रकरण?
ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीत चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेराने रंगेहाथ पकडलं. या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बॅनक्रॉफ्टने खिशातून सँडपेपर काढून, आधी चेंडू त्या सँडपेपरने घासला आणि मग तो सँडपेपरचा तुकडा पुन्हा आपल्या पँटच्या आत दडवला. हे पूर्ण दृश्य टेलिव्हिजन कॅमेराने टिपल्याने बॅनक्रॉफ्टला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं.

चेंडूशी छेडछाड केल्याची स्मिथकडून कबुली
चेंडूशी छेडछाड केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर स्टीव्ह स्मिथने माफी मागितली. ''चेंडूशी छेडछाड केल्यामुळे आम्हाला फायदा होईल, असं वाटलं होतं. संघ व्यवस्थापनाला याची माहिती होती. मात्र प्रशिक्षकांचा यामध्ये सहभाग नाही. ही अभिमानाची गोष्ट नाही. माझ्या नेतृत्त्वात पुन्हा अशी चूक होणार नाही,'' असं स्टीव्ह स्मिथ म्हणाला होता.

स्मिथला कर्णधारपदावरुन हटवा : ऑस्ट्रेलिया सरकार
ही घटना धक्कादायक आणि निराशाजनक असल्याचं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅल्कम टर्नबुल यांनी म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेतील बातम्या सकाळी-सकाळी पाहून दुःख झालं. ऑस्ट्रेलिया संघाच्या या प्रकारामुळे विश्वासाला तडा गेला असल्याचंही ते म्हणाले.

संपूर्ण देशाला शरमेने मान खाली लावायला लावणारी ही घटना आहे. त्यामुळे लवकरच क्रिकेट ऑस्ट्रेलिया यावर कारवाई करेन, अशी अपेक्षा करत असल्याचं टर्नबुल म्हणाले. त्यानुसार क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कर्णधार आणि उपकर्णधारावर कारवाई केली.

संबंधित बातम्या

मला माफ करा, पत्रकार परिषदेत स्मिथ ढसाढसा रडला

ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लिमन यांचा राजीनामा

बॉल टॅम्परिंगमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, मॅगलनने करार मोडला!


बॉल टॅम्परिंग वादात शेन वॉर्नचा सचिन तेंडुलकरवर निशाणा