नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने खळबळजनक वक्तव्य केलं आहे. बीसीसीआयमधील काही अधिकाऱ्यांचा पाठिंबा नसल्यामुळे टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होता आलं नाही. या पदासाठी आता पुन्हा अर्ज करणार नाही, असं सेहवागने म्हटलं आहे.


टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्त्री आणि सेहवाग यांच्यात मुख्य टक्कर होती. मात्र रवी शास्त्री यांची निवड करण्यात आली. हा निर्णय क्रिकेट सल्लागार समितीलाही मान्य नव्हता. या समितीनेच प्रशिक्षकपदासाठी मुलाखती घेतल्या होत्या.

''जे प्रशिक्षक निवडणारे होते त्यांच्याशी माझी सेटिंग नसल्यामुळे मी प्रशिक्षक होऊ शकलो नाही. अर्ज करत असतानाच बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांनी मन विचलित करण्याचा प्रयत्न केला,'' असा दावा सेहवागने 'इंडिया टीव्ही'च्या एका कार्यक्रमात बोलताना केला.

टीम इंडियाला प्रशिक्षण देण्याचा आपण कधीही विचार केला नव्हता. मात्र बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांनी अर्ज करण्यासाठी आग्रह केला. त्यानंतर विचार करण्यासाठी वेळ घेतला आणि अर्ज केला, अशी माहितीही सेहवागने दिली.

अर्ज करण्यापूर्वी विराट कोहलीचाही सल्ला घेतला होता. त्यानंतरच अर्ज करण्याचा निर्णय घेतला. प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणं ही माझी स्वतःची इच्छा नव्हती आणि यापुढेही कधी अर्ज करणार नाही, असंही सेहवागने स्पष्ट केलं.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या काळात इंग्लंडमध्ये असताना रवी शास्त्री यांना विचारलं होतं, की तुम्ही अर्ज का केला नाही. तर त्यांनी उत्तर दिलं की एकदा केलेली चूक पुन्हा करायची नाही. रवी शास्त्री यांनी माझ्या अगोदर अर्ज केला असता तर मी अर्ज करण्याची कसलीही शक्यता नव्हती, अशी माहितीही सेहवागने दिली.