मुंबईत होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनं आणि खासगी बस सेवा बंदी घालण्यात आली होती. यानंतर खासगी बस चालक-मालकांना पोलीस आयुक्तांची भेट घेतली.
यावेळी पोलीस आयुक्तांनी आम्ही लवकरच ही बंदी उठवू असं आश्वासन दिलं. मेट्रोची कामं, रस्ते दुरुस्ती यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर सध्या मोठी वाहतूक कोंडी होत आहे.
मुंबईतील रोजच्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी पोलीस आयुक्तांनी सूचना मागवल्या. हीच संधी साधून 12 सप्टेंबरला वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्क्युलरवजा फतवा काढला.
त्यानुसार सकाळी सात ते दुपारी 11 वाजेपर्यंत अवजड वाहनं, प्रवासी बसेसना मुंबईत प्रवेश मिळणार नाही.
शाळेच्या बसेस आणि कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेसना रस्त्यालगत पार्किंग करता येणार नाही. मुंबईतून निघणाऱ्या बसेसना रात्री 9 च्या आधी शहरातून प्रवाशांसह बाहेर निघता येणार नाही.
मुंबईत परत येताना सकाळी 7च्या आत मुंबईत यावं लागेल, नाहीतर प्रवाशांना मुंबईबाहेर सोडावं लागेल.
पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकरांना अशी कारवाई सुरु असल्याची किंचितही कल्पना नव्हती. त्यामुळे बस मालक संघटना आणि पोलिसांच्या बैठकीत अमितेश कुमार यांची चांगलीच अडचण झाली. पण या खेळात बसचालक आणि प्रवाशी भरडले जात आहे.
बस मालक संघटनेनं हा फतवा मागे घेण्यासाठी 24 तासाचा वेळ दिला आहे. नाहीतर 19 तारखेपासून दोन दिवसाच्या संपाची घोषणा केली आहे.
मुंबईत 25 लाखापेक्षा जास्त वाहनं आहेत. दुचाकी आणि जड वाहनांची संख्या वेगळी. त्यात कुलाब्यापासून ते अंधेरीपर्यंत सगळीकडे मेट्रोची कामं सुरु आहेत. खड्ड्यांनी प्रवास आणखी अवघड केला आहे. पण त्यावर असा तुघलकी फतवा औषध कसा काय असू शकतो?