शांघाय : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार मिसबाह उल हकने हाँगकाँग टी20 ब्लिट्झ स्पर्धेत सहा चेंडूंत सहा षटकार ठोकण्याचा पराक्रम गाजवला. एकाच षटकात नाही, तर त्याने खेळलेल्या सलग सहा चेंडूंमध्ये मिसबाहने ही कामगिरी बजावली.

असा पराक्रम करणारा मिसबाह उल हक हा पहिलाच पाकिस्तानी क्रिकेटर ठरला आहे.

मिसबाहने हाँगकाँग आयलंड संघाकडून खेळताना जॅग्वार्स संघाविरुद्धच्या सामन्यात एकोणिसाव्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकले. मग विसाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सईद अजमलने एक धाव काढली. मिसबाहने त्यानंतर सलग चार षटकार आणि एक चौकार लगावला.

त्याने एकूण 37 चेंडूंत 82 धावा फटकावल्या. त्यामुळे हाँगकाँग आयलंडने 20 षटकांत सहा बाद 216 धावांची मजल मारली आणि जॅग्वार संघाला 183 धावांत गुंडाळून 33 धावांनी विजय साजरा केला.

विशेष म्हणजे आदल्या दिवशीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मिसबाहला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर निवृत्ती घेण्याचा आदेश दिला होता. पण आता पाकिस्तानच्या कर्णधाराने बॅटनेच पीसीबीला प्रत्युत्तर दिलं आहे.

पाहा व्हिडीओ