Mirabai Chanu : ऑलिम्पिक पदक विजेती आणि भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू (Mirabai Chanu) हिने शुक्रवारी सिंगापूर वेटलिफ्टिंग इंटरनॅशनल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. या यशामुळे ती राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. मीराबाई आता कॉमनवेल्थ गेम्समध्ये 55 किलो वजनी गटात वेटलिफ्टिंग करताना दिसणार आहे.


चानू प्रथमच 55 किलो वजनी गटाच्या स्पर्धेत सहभागी झाली आहे. या स्पर्धेत तिने 191 किलो (86 किलो आणि 105 किलो) वजन उचलले. तिला कोणत्याही खेळाडूकडून आव्हान मिळाले नाही. मीराबाईनंतर दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाची जेसिका सेवास्टेन्को आहे. जेसिकाने मीबराबाई खालोखाल 167 किलो (77 किलो आणि 90 किलो) वजन उचलले.  त्यानंतर मलेशियाच्या अ‍ॅली कॅसांड्रा एंजेलबर्टने 165 किलो (75 किलो आणि 90 किलो) वजनासह तिसरे स्थान पटकावले.


मागच्या वर्षी टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकून मीराबाईने इतिहास रचला आहे. मीराबाईच्या या यशामुळे भारताचा वेटलिफ्टिंगमधील पदकाची 21 वर्षांची प्रतीक्षा संपली. मीराबाई चानूने 49 किलो वजनी गटात हे पदक जिंकले होते. मीराबाईने स्नॅच अँड क्लीन अँड जर्क फेऱ्यांमध्ये एकूण 202 किलो वजन उचलून हे पदक जिंकले होते. 


दरम्यान, टोकियो स्पर्धेनंतर आता ही पहिलीच स्पर्धा आहे. ऑलिम्पिकनंतर तिने डिसेंबरमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून माघार घेतली होती. 27 वर्षीय चानू कॉमनवेल्थ रँकिंगच्या आधारे 49 किलो वजनी गटात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरली होती. मात्र, भारताला आणखी सुवर्णपदके मिळण्याची शक्यता वाढवण्यासाठी चानूने 55 किलो वजनी गटात भाग घेण्याचा निर्णय घेतला आहे.





 


सिंगापूर वेटलिफ्टिंग आंतरराष्ट्रीय स्पर्धा ही यावर्षी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्रता स्पर्धा आहे. या स्पर्धेत प्रत्येक वजन गटातील अव्वल आठ वेटलिफ्टर्स थेट राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. 


महत्वाच्या बातम्या


Mirabai Chanu | रौप्यपदक विजेती मीराबाई चानूने घेतली सचिन तेंडुलकर, सलमान खानची भेट


ऑलिम्पिक मेडलिस्ट मीराबाई चानूने पिझ्झा खाण्याची इच्छा व्यक्त केली, Dominos कडून लाईफटाईम फ्री पिझ्झाची घोषणा


Mirabai Chanu : चिमुकलीचं मीराबाई चानूच्या पावलावर पाऊल, 'ज्युनिअर मीराबाई चानू'चा व्हिडिओ व्हायरल