रिओ दी जानेरो : रिओ ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेचा जलतरणपटू मायकल फेल्प्सने आणखी एका सुवर्णपदकाची कमाई केली आहे. फेल्प्सने 200 मीटर वैयक्तिक मेडली प्रकारात एक मिनिट आणि 54.66 सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावलं.


 

फेल्प्सचं कारकीर्दीतलं हे 22वं, तर यंदाच्या ऑलिम्पिकमधलं चौथं सुवर्णपदक ठरलं. याआधी फेल्प्सने 200 मीटर बटलफ्लाय तसंच 4X 200 मीटर फ्रीस्टाईल रिले आणि 4X 400 फ्रीस्टाईल रिलेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. त्यामुळे फेल्प्सच्या नावावर ऑलिम्पिकमध्ये एकूण 26 पदकं जमा झाली आहेत.

 

फेल्प्सने त्याच्या पहिल्याच म्हणजे अथेन्स ऑलिम्पिकमध्ये 6 सुवर्ण आणि 2 कांस्य पदकाची कमाई करुन विक्रम रचला होता. त्यानंतर बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 8 सुवर्णपदकं खिशात टाकली होती. 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये फेल्प्सने 4 सुवर्ण आणि 2 रौप्य पदक आणि आताच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये 4 सुवर्णपदकाची कमाई केली आहे.