MI vs RR, IPL 2021: दिल्लीमध्ये झालेल्या आयपीएल सामन्यात मुंबईने राजस्थानवर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. राजस्थाननं मुंबईसमोर विजयासाठी 172 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान मुंबईनं 9 चेंडू राखून तीन विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मुंबईकडून क्विंटन डि कॉकनं शानदार 70 धावांची खेळी केली. 172 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि क्विंटन डि कॉकनं संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र रोहित 17 चेंडूत 17 धावा करुन बाद झाला. त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादवही मोठी खेळी करु शकला नाही. 


सूर्यकुमारनं 10 चेंडूत 16 धावा केल्या. मात्र क्विंटननं एक बाजू जबरदस्त खेळी तर 50 चेंडूत नाबाद 70 धावांची खेळी केली. कृणाल पांड्यानेही त्याला चांगली साथ दिली. त्याने 26  चेंडूत 39 धावांची खेळी केली. क्रुणाल बाद झाल्यानंतर क्विंटननं पोलार्डसोबत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. 


तत्पूर्वी पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थाननं 171 धावा केल्या होत्या. राजस्थानला सलामीच्या जोडीनं चांगली सुरुवात करून दिली. सलामीला आलेल्या जोस बटलरने 32 चेंडूत 41 धावा केल्या. त्यात  त्याने 3 चौकार आणि 3 षटकार लगावले. तर यशस्वी जयस्वालने 20 चेंडूत 32 धावा केल्या. सुरुवात चांगली होऊन देखील मोठी धावसंख्या उभारण्यात कर्णधार संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांना अपयश आलं. त्यामुळे राजस्थाननं 171 धावांपर्यंत मजल मारता आली. संजू सॅमसनकडून 27 चेंडूत 42 धावा केल्या तर  शिवम दुबे 35 धावा करत तंबूत परतला.  


मुंबईनं आता 6 सामन्यांपैकी 3 सामन्यांमध्ये विजय मिळाला असून 3 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईचा संघ सहा गुणांसह पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. राजस्थानचा संघानेही 6 पैकी 2 सामन्यांत विजय मिळाला असून चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे राजस्थानचा संघ पॉईंट टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे.