पुणे : लॉकडाऊनमुळे गावाकडे परतणाऱ्या परप्रांतीय मजुरांकडून पुणे रेल्वे स्टेशनवर धमकावून पैसे घेतले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे पैसे रेल्वे पोलिसांचे कर्मचारी घेत असल्याचा आरोप होतो आहे. तर दुसरीकडे पैसे घेणारे लोक हे पोलिसांच्या वेशातील भामटे असल्याचा दावा रेल्वे पोलिसांनी केलाय. महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकारानंतर पुणे रेल्वे स्टेशनमध्ये तैनात असलेल्या 22 पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. 


लॉकडाऊनमुळे रोजगार गमवावा लागल्याने आधीच अडचणीत सापडलेल्या या मजुरांची  घरी परतताना देखील लूट केली जात आहे. घरी परतण्यासाठी हे मजूर पुणे रेल्वे स्टेशन येथे आले की त्यांच्याकडे असलेलं रेल्वेचं तिकीट पाहून त्यांना प्लॅटफॉर्मवर प्रवेश दिला जातो. परंतु तिथून पुढे रेल्वेमध्ये प्रवेश करण्यास त्यांच्याकडे आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांची मागणी केली जाते आणि ती नाहीत हे कारण देत त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जात आहे. 


Corona Vaccine |दोन डोसमधील अंतर तीन महिन्यापेक्षा जास्त झाल्यास पुन्हा नव्याने लसीकरण: डॉ. राहुल पंडित


रेल्वे प्रवासी सल्लागार समितीला याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आधी रेल्वे अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पण हा पोलिसांचा विषय आहे असं म्हणत त्यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. रेल्वे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांच्याकडे याची तक्रार पोहोचताच त्यांनी रेल्वे स्टेशनवर नेमणुकीस असलेल्या 22 पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर रेल्वे स्टेशनवर बंदोबस्तासाठी असलेल्या एक पोलीस उपअधीक्षक, दोन पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक आणि चार सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश दिले आहेत.  


Coronavirus: लसीकरणाचा वेग मंदावल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल, तज्ज्ञांचा इशारा


या प्रकारानंतर आता आपापल्या गावी जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर येणारे परप्रांतीय मजूर सोबत आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे सोबत बाळगत आहेत. लॉकडाऊनमुळे आधीच संकटात सापडलेले हे मजूर कसं तरी करुन स्वतःच घर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना देखील अशाप्रकारे नाडलं जातंय.