नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला आहे. दररोज लाखोंच्या संख्येने नवीन कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. अनेक रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकार तसेच अनेक खाजगी कंपन्या आणि स्वयंसेवी संस्था कोविड संक्रमित रूग्णांच्या उपचाराशी संबंधित पायाभूत सुविधा सुधारण्यात गुंतल्या आहेत. आता रिलायन्स फाऊंडेशननेही याकामी पुढाकार घेतला आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये ऑक्सिजन पुरवठा करणारे 1000 खाटांचे कोविड रुग्णालय बांधणार आहेत. या रुग्णालयात रूग्णांना मोफत उपचार सुविधा मिळतील, असे फाऊंडेशनने म्हटले आहे.
फाउंडेशनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की जामनगरमधील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय परिसरात आठवड्याभरात 400 खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर, येत्या दोन आठवड्यांत जामनगरमध्येच 600 खाटांचे केंद्र बांधले जाईल.
रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी सांगितले की, “कोविडच्या दुसर्या लाटेचा सामना भारत करत आहे.” आम्ही सर्वतोपरी मदत करण्यास वचनबद्ध आहोत. आरोग्याशी संबंधित अतिरिक्त सुविधा पुरवणे ही काळाची गरज आहे. ''
पुढे त्या म्हणाल्या, की "रिलायन्स फाउंडेशन जामनगरमध्ये कोविड रूग्णांसाठी ऑक्सिजनसह 1000 खाटांचे रुग्णालय उभारत आहे. पुढच्या आठवड्यात 400 खाटांचा पहिला टप्पा तयार होईल. त्यातून पुढच्या एका आठवड्यात आणखी 600 बेड तयार होतील. हे रुग्णालय मोफत दर्जेदार सेवा देईल.
रिलायन्स फाऊंडेशनचा पुढाकार, मुंबईत 775 बेडस् नवे उपलब्ध
महाराष्ट्रात आणि खासकरुन मुंबईत कोरोनानं थैमान घातलं आहे. अशात कोविड पेशंटला बेडसह ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. अशात अनेक सामाजिक संस्था मदतीसाठी पुढं येऊ लागल्या आहेत. रिलायन्स फाऊंडेशनकडून मुंबईत 875 बेडस् नवे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. एच एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये 600, वरळतील एनएससीआय मध्ये 100, सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये 45 आयसीयुसह 125 बेडस् तर ट्रायडंट, बिकेसी येथे 100 बेडस् ची नव्यानं उपलब्धता करुन देण्यात आली आहे.
माहितीनुसार, वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियामध्ये कोविड रुग्णांसाठी असलेली 650 बेड्सची सुविधा रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने चालवण्यात येणार आहे. सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय कोरोना रुग्णांसाठींच्या एकूण 650 खाटांचे परिचलन व व्यवस्थापन करेल. याशिवाय अधिकच्या 100 ICU बेड्सची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. 15 मेपासून हे बेड्सच उपलब्ध होतील, अशी माहिती आहे. रिलायंस फाऊंडेशनकडून 500 हून अधिक वैद्यकीय फ्रंटलायनर्स यामध्ये डॉक्टर, नर्स, नॉन मेडिकल स्टाफ यांना सुविधांच्या देखभालीसाठी नेमण्यात आलं आहे. ICU बेड, क्वारंटाइन वॉर्ड, व्हेंटिलेटर्स, सगळ्या आरोग्य सुविधांची जबाबदारी रिलायन्स फाउंडेशन करणार आहे.