मेक्सिको सिटी : फिफा विश्वचषकात रविवारी झालेल्या सामन्यात मेक्सिकोने डिफेन्डिंग चॅम्पियन जर्मनीचा 1-0 असा पराभव केला. आपल्या संघाच्या या विजयामुळे मेक्सिकोचे चाहते एवढे बेभान होऊन नाचले की देशात कृत्रिम भूकंप आला. भूकंपाची तपास करणाऱ्या यंत्रावर याची नोंद करण्यात आली. मेक्सिकोच्या संघाने गोल करताच चाहते नाचायला लागले आणि या यंत्रावर हादरे जाणवले.


चाहते मेक्सिको सिटीमधील प्रसिद्ध एंजल ऑफ इंडिपेन्डेंट्स स्मारकाजवळ जमा झाले आणि देशाचे झंडे फडकावत गाणं गात होते. स्टार फुटबॉलर हिरविंग लोजानोने 35व्या मिनिटात गोल करताच, चाहते आनंदाने 'आम्ही करुन दाखवलं', असं ओरडू लागले, नाचू लागले.  मेक्सिकोच्या भूगर्भीय आणि वातावरणीय संशोधन संस्थेच्या माहितीनुसार, सकाळी 11 वाजून 32 मिनिटांनी जेव्हा लोजानोने जर्मनीविरुद्ध गोल केला तेव्हा एक मोठा हादरा जाणवला.


एंजल ऑफ इंडिपेन्डेंट्सजवळ उपस्थित चाहते आनंदाने 'मेक्सिको, मेक्सिको, मेक्सिको'च्या घोषणा देत होते. आमचा संघ आता इतर 15 संघांसह पुढच्या राऊंटमध्ये पोहोचली, असा चाहत्यांना विश्वास आहे. मेक्सिकोचा संघा उपांत्यपूर्वी, उपांत्य किंवा अंतिम सामन्यातही पोहोचेल, अशी त्यांना अपेक्षा आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी गोलकीपर गुलिमेरो ओचाओच्या कामगिरीची प्रचंड कौतुक केलं.

दरम्यान, ओपनिंग मॅचमध्ये पराभूत होण्याची जर्मनीची 1982 नंतर ही पहिलीच वेळ आहे.