सांगली: पावसाळी अधिवेशनापूर्वी मराठा आरक्षणाचा निर्णय द्यावा, अन्यथा मराठा समाजाचा संयमाचा बांध सुटेल, मुके मोर्चे बोलके होतील, असा गर्भित इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून सरकारला देण्यात आला.


सांगलीत काल पार पडलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत हा इशारा देण्यात आला.

यावेळी आरक्षणासोबतच इतर मागण्यांबाबतही सरकारने कालमर्यादा निश्चित करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

याशिवाय भीमा कोरेगाव दंगलीत हत्या झालेल्या राहुल फटांगडेच्या मारेकऱ्यांच्या अटकेच्या मागणीसाठी 9 जुलै रोजी पुणे येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.

राज्यभरातील कार्यकर्त्यांची बैठक

सांगली -मिरज रोडवरील भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात काल मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीसाठी विविध जिल्ह्याच्या प्रमुख नेत्यांनी आज हजेरी लावली होती.

राज्य सरकारने मराठा समाजाच्या महामोर्चानंतर शैक्षणिक सवलत वगळता इतर एकही आश्‍वासन पूर्ण केलेले नाही. अन्य आश्वासन पूर्तता होईल, असे पाऊल अद्याप उचलले गेले नाही. त्यामुळे समाजात सरकारविरुद्ध असंतोष खदखदतोय. आणि तो सरकारला दाखवण्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरण्याची तयारी केली पाहिजे, असे मत यावेळी विविध जिल्ह्यातून आलेल्या मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आणि नेत्यांनी व्यक्त केला.



कोपर्डीतील बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर उद्‌भवलेली स्थिती, मराठा समाजाच्या अडचणी, शेतकरी प्रश्‍नावर समाजाने एकत्र लढण्याची गरज यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांना कर्जपुरवठा करण्यास बँका नकार देत आहेत. अशा बँकांविरुद्ध आंदोलन करावे,अशी मागणीही यावेळी अनेक वक्त्यांनी केली.

बैठकीनंतर मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी राज्य सरकारने मराठा आरक्षण निर्णय जाहीर करावा, अन्यथा मराठा समाजाचा संयमाचा बांध फुटेल. आतापर्यंत मुके निघालेले मोर्चे यापुढे बोलके आणि आक्रमक मोर्चे होतील. त्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी मराठ्यांना आरक्षणाचा निर्णय घ्यावा, असा इशारा देण्यात आला.

भीमा कोरेगाव दंगलीमध्ये मृत्यू झालेल्या राहुल फटांगडे यांच्या कुटुंबाला राज्य सरकारने ५० लाख रुपये आर्थिक मदत द्यावी. तसंच राहुलच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी 9 जुलै रोजी पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

एक जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा हिंसाचारात राहुल फटांगडेचा मृत्यू झाला होता. या हत्येप्रकरणी अहमदनगरच्या श्रीगोंदा इथून 3 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आणखी एका आरोपीला अटक केली आहे. तर चार आरोपींची रेखाचित्र पोलिसांनी जारी केली आहेत.

संबंधित बातम्या 

राहुल फटांगडेच्या मारेकऱ्यांचं छायचित्र जारी