मेलबर्न : ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न क्रिकेट क्लबवर झालेल्या महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप फायनलला आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. एमसीजीनं (मेलबर्न क्रिकेट क्लब) एका पत्रकाद्वारे याची माहिती प्रसिद्ध केली आहे. परंतु, या व्यक्तीमुळे संक्रमण होण्याचा धोका कमी असल्याचेही एमसीजीने म्हटले आहे.


ही व्यक्ती एमसीजीच्या सेक्शन ए 42 मध्ये उत्तरेकडील स्टँडच्या लेव्हल 2 मध्ये बसला होता. आरोग्य आणि जनसेवा विभागाने सल्ला दिला आहे की, एन 42 मध्ये बसलेल्या लोकांनी आपली सामान्य दिनचर्या सुरु ठेवावी आणि साफसफाईवर लक्ष द्यावे. त्याचबरोबर खोकला-सर्दीसारख्या लक्षणांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत ट्वेन्टी ट्ववेन्टी विश्वचषकासाठी झालेली फायनल ही आयसीसीसाठी ड्रीम फायनल ठरली. मेलबर्नमधल्या या फायनलला तब्बल 86 हजार 174 प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. महिलांच्या क्रिकेट सामन्याला झालेली ही आजवरची सर्वात विक्रमी गर्दी ठरली. आंतरराष्ट्रीय महिलादिनी प्रेक्षकांनी विश्वचषकाच्या फायनलला दिलेला प्रतिसाद महिला क्रिकेटची उमेद वाढवणारा होता.

मेग लॅनिंगच्या ऑस्ट्रेलियानं भारताचा 85 धावांनी पराभव करुन महिलांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. ऑस्ट्रेलियानं आजवरच्या इतिहासात पाचव्यांदा विश्वचषकाचा मान मिळवला. मेलबर्नच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी 185 धावांचं आव्हान दिलं होतं. पण त्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 19 षटकांत सर्व बाद 99 धावांचीच मजल मारता आली. त्यामुळं भारतीय महिलांचं पहिल्या विश्वचषकाचं स्वप्न पुन्हा अधुरं राहिलं. भारतीय महिलांना 2017 साली वन डे विश्वचषकाच्या फायनलमध्ये हार स्वीकारावी लागली होती.

संबंधित बातम्या : 

T20 World Cup | ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा उंचावला विश्वचषक; भारतीय महिला संघाचा 85 धावांनी पराभव

IND vs SA, Coronavirus | चेंडूला चमकवण्यासाठी खेळाडूंनी कमीत कमी थुंकीचा वापर करावा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

coronavirus | आयपीएल सामन्यांच्या तिकीटविक्रीवर बंदी घालण्याचा सरकारचा विचार