नवी मुंबई : एआयबीआय महिला विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेत पाच वेळेस विश्व विजेती ठरलेल्या मेरी कोमने आज सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मेरी कोमने चीनच्या यू वु वर 5-0 ने शानदार विजय मिळवला. या विजयासह मेरी कोमने एआयबीआय महिला विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेतील सातव्या पदकावर आपली दावेदारी निश्चित केली आहे.

मेरी कोम गुरुवारी होणाऱ्या सेमीफायनल सामन्यात उत्तर कोरियाच्या ह्यांग मि किमशी भिडणार आहे. यापूर्वी झालेल्या आशियाई चॅम्पियन स्पर्धेत मेरी कोमने ह्यांग मि किमचा पराभव केला होता.

दरम्यान मेरी कोमने आज आपल्या आक्रमक शैलीत खेळत, चीनी बॉक्सर यू वु ला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला. दोन्ही हाताने ठोसे मारुन मेरीने गुण मिळवले. "हे अवघडही नव्हते, आणि सोपेही नव्हते. मी रिंगमध्ये लक्ष विचलित होऊ देत नाही, ज्याचा फायदा मला मिळतो. चीनी बॉक्सर मजबूत असतात, परंतू यू वु सोबत माझा पहिला सामना होता." असं मेरी कोम म्हणाली.

पुढील सामन्याबद्दल तिला विचारलं असता, ती म्हणाली सेमीफायनलमध्ये माझा जिच्यासोबत सामना होणार आहे, त्या ह्यांग मि किमला मी आशियाई स्पर्धेत पराभूत केले होते. तरी मी अतिआत्मविश्वासात खेळणार नाही, असं मेरी म्हणाली.