लंडन: रशियाची टेनिसस्टार मारिया शारापोव्हावर आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशननं उत्तेजक सेवनप्रकरणी दोन वर्षांसाठी बंदीची कारवाई केली आहे. 26 जानेवारी 2016 पासून ही कारवाई लागू करण्यात आली आहे. त्यामुळं शारापोव्हाला 25 जानेवारी 2018 पर्यंत कुठल्याही स्वरुपाचं स्पर्धात्मक टेनिस खेळता येणार नाही.

 

शारापोव्हाच्या रक्तात मेल्डोनियम या प्रतिबंधित औषधाचे अंश आढळून आल्याचं मार्च महिन्यात स्पष्ट झालं होतं. शारापोव्हानं पत्रकार परिषदेत स्वतः या घटनेची कबुली दिली होती. यंदा जानेवारीपासून वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी अर्थात वाडानं मेल्डोनियमवर बंदी घातली आहे. मात्र त्याविषयी माहिती देणारा ईमेल आपल्याकडून वाचायचा राहून गेला असं स्पष्टीकरण शारापोव्हानं दिलं होतं.

 

18 आणि 19 मे रोजी एका स्वतंत्र खंडपीठासमोर शारापोव्हाची सुनावणी झाली. शारापोव्हानं जाणूनबुजून मेल्डोनियमचं सेवन केलं नसल्याचं आयटीएफनं स्पष्ट केलं आहे. मात्र नियमांचा भंग केल्यामुळं शारापोव्हावर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

 

शारापोव्हा या बंदीविरोधात स्वित्झर्लंडस्थित कोर्ट ऑफ आर्बिटरेशन फॉर स्पोर्टसमध्ये अपील करणार आहे.