मुंबई : क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर काय करणार याचं उत्तर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने दिलं आहे. धोनीने शेअर केलेल्या एका व्हिडीओत निवृत्तीनंतर बालपणापासूनचा छंद जोपासणार असल्याचं त्याने म्हटलं आहे.


भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी त्याच्या करिअरच्या अंतिम टप्प्यावर आहे. मात्र चाहत्यांच्या मनात त्याच्याविषयीचं प्रेम काडीमात्रही कमी झालेलं नाही. धोनी सध्या आयसीसी विश्वचषक 2019 ची तयारी करत आहे. भारताला तिसऱ्यांदा जगज्जेता बनवण्याचा त्याचा प्रयत्न असेल.

आयसीसी विश्वचषक 2019 मधील सर्व दहा संघ आणि त्यांचे खेळाडू

महेंद्रसिंह धोनीच्या एका व्हिडीओची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा आहे. या व्हिडीओमध्ये धोनीने निवृत्तीनंतरच्या आयुष्याचा खुलासा केला आहे. व्हिडीओमध्ये धोनी म्हणतो, 'मला तुमच्यासोबत एक सिक्रेट शेअर करायचं आहे. बालपणापासूनच मला चित्रकार बनायचं होतं. मी खूप क्रिकेट खेळलो आहे. आता बालपणीचा छंद जोपासण्याची वेळ आली आहे. म्हणून मी काही चित्रे रेखाटली आहेत. निवृत्तीनंतर पेंटिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा असल्याचं धोनीने सांगितलं. शिवाय त्याने काही चित्रेही दाखवली.


ही चित्रे उत्तम असतील अशी अनेकांची अपेक्षा होती, पण त्यांचा भ्रमनिरास झाला. एकीकडे निवृत्तीनंतरच्या योजनेचा धोनीने खुलासा केला. पण या व्हिडीओमधून असेही संकेत मिळाले की, तो एवढ्यात निवृत्ती घेण्याच्या मूडमध्ये नाही. निवृत्तीआधी त्याच्या उपस्थितीत भारताला विश्वचषक मिळावा, अशी धोनीची इच्छा आहे.

भारताचा पहिला सामना 5 जून रोजी
आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 ची सुरुवात 30 मे पासून इंग्लंड आणि वेल्समध्ये होत आहे. यामध्ये एकूण दहा संघांमध्ये लढत होणार आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना 14 जुलै रोजी होणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे. तर 16 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगेल.

विश्वचषकासाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के एल राहुल, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, विजय शंकर, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी

संबंधित बातम्या

ICC World Cup 2019 : विश्वचषकात प्रत्येक संघासोबत अॅण्टी करप्शन अधिकाऱ्याची नियुक्ती

ICC WORLD CUP 2019 : विश्वचषकापर्यंत केदार जाधव फिट नसल्यास 'या' पाचपैकी एकाला मिळणार संधी

विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, पाहा कोणकोणत्या क्रिकेटपटूंची निवड

World Cup 2019 साठी टीम इंडिया जाहीर : भारताकडे काय आहे, काय नाही?