मुंबई : लोकसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यातच पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची चिन्हं आहेत.
मुंबईत एक लिटर पेट्रोलचा दर 76.73 रुपयांवर पोहचला, तर डिझेलने 69.27 रुपयांचा दर गाठला. त्यामुळे सर्वसामान्य वाहनचालकांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे.


निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारी इंधन कंपन्यांनी दरवाढ टाळली होती. गेल्या दहा दिवसात पेट्रोलचे दर 1.80 रुपयांनी तर, डिझेलचे दर 63 पैशांनी कमी झाले होते. परंतु निकालाचा दिवस समीप येताच इंधनदरवाढ होण्याची चिन्हं आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीचा परिणाम देशातील इंधन दरावर होणार आहे.

VIDEO | लोकसभा निवडणुकांनंतर पेट्रोल दरवाढ होणार? | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा



आंतरराष्ट्रीय बाजारातील उलाढाली

इंधन निर्यातदार देशांनी (ओपेक) इंधन पुरवठ्यात आखडता हात घेतल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाच्या दरात काही दिवसांपासून सतत वाढ होत आहे. अशातच अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध लादून सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्याने भारतासह काही देशांना इराणकडून होणारी इंधनआयात शून्यावर आणावी लागली. यामुळे कच्च्या इंधनाच्या दरावर मोठा दबाव असून त्याचे दर सतत चढेच राहिले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाचे दर सोमवारी प्रतिबॅरल 72 अमेरिकन डॉलरवर पोहचले. हे दर काही दिवसांपूर्वी 69 अमेरिकन डॉलर होते. मात्र अमेरिका आणि इराणमधील तणाव निवळण्याची चिन्हं नसल्याने तसंच 'ओपेक' देशांकडून पुरेसा इंधनपुरवठा होत नसल्याने येत्या काही दिवसात कच्च्या इंधनाचे दर प्रतिबॅरल 90 अमेरिकी डॉलरपर्यंत उसळी घेतील, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.