मोहाली : रविवारी आयपीएलमधल्या अकराव्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जला चार धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र या सामन्यात प्रत्येक जण महेंद्रसिंह धोनीलाच पाहत होता. चेन्नईचा पराभव झाला असला तरी धोनीने हा सामना अविस्मरणीय बनवला.


कठीण परिस्थितीतही धोनीने एकाकी झुंज दिली. शक्य दिसत नसतानाही त्याने चेन्नईला विजयाच्या जवळ नेलं. या सामन्यात त्याला पाठीच्या दुखण्याचा त्रासही जाणवला. खेळतानाच त्याला मैदानावर डॉक्टरांची मदत घ्यावी लागली. मात्र माघार न घेता तो खेळत राहिला आणि ही खेळी अविस्मरणीय बनवली.

जगातल्या बेस्ट फिनिशरपैकी एक म्हणून धोनी ओळखला जातो. हेच त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं. त्यामुळे पाठीचा त्रास जाणवत असतानाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवणं त्याच्यासाठी अवघड काम नाही.


लॉफ्टेड शॉट मारण्यासाठी फलंदाजाला शरीर अशा स्थितीत ठेवावं लागतं, जेणेकरुन वजन शॉटवर येईल. हा शॉट कसा मारला याबाबत धोनीला सामन्यानंतर विचारण्यात आलं. मात्र हे काम आपल्यासाठी अवघड नसल्याचं तो म्हणाला.

''पाठीच्या त्रासामुळे परिस्थिती खराब आहे, मात्र देवाने मला मोठे फटकार मारण्याची शक्ती दिली, ज्यामुळे पाठीचा जास्त वापर करावा लागला नाही. हे काम करण्यासाठी माझे हातच पुरेसे आहेत,'' असं धोनी म्हणाला. शिवाय ही फार गंभीर दुखापत नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं.


धोनीने 44 चेंडूत 79 धावांची खेळी केली. ज्यामुळे सीएसके विजयाच्या अगदी जवळ पोहोचली, मात्र केवळ चार धावांनी सीएसकेचा पराभव झाला.