मुंबई : महाराष्ट्र शासनानं मोठा गाजावाजा करुन भारताच्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या सेवेत सामावून घेतलं. पण वेगवेगळी कारणं पुढे करतं भारताच्या या खेळाडूंना शासनाने पगार दिलेला नाही.

नेमबाज राही सरनोबत, कबड्डीपटू दीपिका जोसेफ, नेमबाज पूजा घाटकर यांना महाराष्ट्र शासनानं मोठा गाजावाजा करुन शासकीय सेवेत सामावून घेतलं पण या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा पगार शासनाने दिलेला नाही. राही सरनोबत उपजिल्हाधिकारी म्हणून शासनाच्या सेवेत आहे. परंतू सराव आणि विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमुळे राहीला कार्यालयात उपस्थित राहता येत नाही आहे. परिणामी तिला प्रशिक्षण पूर्ण करता आलेलं नाही. याच कारणामुळे 2017 सालापासून राही सरनोबतचा पगार थांबवण्यात आला आहे. तब्बल दीड वर्षे राहीला पगार मिळालेला नाही.

VIDEO | राज्य शासनानं नोकरी दिलेल्या खेळाडूंना पगारच नाही | एबीपी माझा



भारताची कबड्डीपटू दीपिका जोसेफ विक्रीकर खात्यात सहाय्यक आयुक्त म्हणून सेवेत आहे. दीपिकाचा सुद्धा पगारासंदर्भात आक्षेप आहे. 2014-2015 या कालावधीत दीपिका दुखापतग्रस्त असताना तिला पगार मिळू शकला नव्हता. विक्रीकर खात्याच्याच सेवेत असलेल्या पूजा घाटकरला बिनपगारी रजा घ्यावी लागते.