मुंबई : हैदराबादमध्ये 31 डिसेंबरपासून रंगणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या 15 जणांच्या अंतिम संघाचं नेतृत्त्व रिशांक देवाडिगा करणार आहे.

प्रो कबड्डी लीगमध्ये पूर्वी यू मुंबाकडून खेळणारा रिशांक देवाडिगा मागील मोसमापासून यूपी योद्धा संघाचं प्रतिनिधित्त्व करत आहे.

या स्पर्धेत 31 संघ सहभागी होणार असून सहा दिवस ही स्पर्धा रंगणार आहे. गचीबोवली इनडोअर स्टेडियममध्ये 31 डिसेंबरपासून सामन्यांना सुरुवात होईल. स्टार स्पोर्ट्सवर या स्पर्धेचे उपांत्यपूर्व फेरीपासूनचे सामन्यांचं प्रक्षेपण होणार आहे.

संघात दोन मुंबईकर
महाराष्ट्राच्या संघात दोन मुंबईकर खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई शहरातून अजिंक्य कापरेची तर मुंबई उपनगरातून कर्णधार रिशांक देवाडिगा निवड झाली आहे.

23 वर्षीय अजिंक्य कापरे हा मुंबईतील विजय क्लबचा अष्टपैलू खेळाडू आहे. प्रो कबड्डी लीगच्या चौथ्या मोसमात अजिंक्यची तेलुगू टायटन्स संघात निवड झाली होती. तर त्याच मोसमात अजिंक्य यू मुंबा फ्युचर स्टार प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ठरला होता.

तर या स्पर्धेत सचिन शिंगाडे आणि गिरीश एर्नाक हे दोन डिफेंडर प्रो कबड्डी लीगमधील अनुभव पणाला लावतील. याशिवाय यू मुंबाचा नितीन मदने आणि निलेश साळुंके यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.



महाराष्ट्राचा संघ
रिशांक देवाडीगा (कर्णधार, मुंबई उपनगर), विकास काळे (पुणे), सचिन शिंगाडे (सांगली), गिरीश एर्नाक (ठाणे), विराज लांडगे (पुणे), नितीन मदने (सांगली), तुषार पाटील (कोल्हापूर), निलेश साळुंके (ठाणे), ऋतुराज कोरवी (कोल्हापूर), सिद्धार्थ देसाई (पुणे), अजिंक्य कापरे (मुंबई शहर), रवी ढगे (जालना)

राखीव खेळाडू
अक्षय जाधव (पुणे), उमेश म्हात्रे (ठाणे), महेंद्र राजपूत (धुळे)