बँकांना बीसीसीआयचे खाते गोठवण्याचे आदेश दिलेले नाहीत. मात्र 30 सप्टेंबरला बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत झालेल्या आर्थिक निर्णयांसंबंधीचे व्यवहार करु नयेत, असे आदेश दिले आहेत, असं स्पष्टीकरण लोढा समितीकडून देण्यात आलं.
बीसीसीआयचे बँक खाते गोठवण्यात आले आहेत, त्यामुळे ही मालिका रद्द होऊ शकते, अशी चर्चा होती. मात्र न्यायमूर्ती लोढा यांनी स्पष्टीकरण देत चर्चांना पूर्ण विराम दिला.
भारत विरुद्ध न्यूझीलंड उर्वरित मालिका होणार का?, लोढा समितीचं स्पष्टीकरण
बीसीसीआयच्या खात्यांवर कसलीही गदा येणार नाही. केवळ वार्षिक सर्वसाधारण बैठकीत घेतलेल्या निर्णयांसाठी निधी न देण्याचे आदेश बँकांना देण्यात आले आहेत. असं स्पष्टीकरण लोढा समितीकडून देण्यात आलं. दरम्यान लोढा समितीच्या या आदेशांमुळे बीसीसीआयच्या कामकाजावर परिणाम होईल, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे.
राज्यातील विविध संघ हा निधी रोखण्यात आल्यामुळे नाराज आहेत. अनेक संघ सामन्यांचं आयोजन करण्यासाठी बीसीसीआयकडून मिळणाऱ्या निधीवर अवलंबून आहेत. आतापर्यंत सात राज्याच्या संघांनी निधीशिवाय सामन्यांचं आयोजन करणं शक्य नसल्याचं कळवलं आहे.
नऊ राज्यांनी याविषयी माहिती मागवली आहे. हे जर असच चालू राहिलं तर न्यूझीलंडविरुद्धची मालिकाही आज सायंकाळपर्यंत रद्द केली जाऊ शकते, असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.