शिमला: हिमाचल प्रदेशातील धर्मशाला कसोटीत टीम इंडियाने हिमालयाच्या साक्षीने विजयाची गुढी उभारली. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने धर्मशाला वनडेत ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने धुव्वा उडवून, कसोटी मालिकेत विजयाची गुढी उभारली.


या विजयासह टीम इंडियाने 4 कसोटी सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली.

या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 300 धावा केल्या होत्या. मग भारताने 332 धावा करत 32 धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 137 धावा केल्या, त्यामुळे भारताला विजयासाठी 106 धावांची गरज होती.

भारताच्या विजयाचे हिरो

1) रवींद्र जाडेजा

भारताच्या विजयात रवींद्र जाडेजाने मोलाची भूमिका बजावली. त्यामुळेच त्याला सामनावीरासह मालिकावीराचाही किताब देण्यात आला.

जाडेजाने धर्मशाला कसोटीत पहिल्या डावात 63 धावा केल्या, तर एक विकेट घेतली.

तर दुसऱ्या डावात जाडेजाने तीन फलंदाज माघारी धाडले. जाडेजाने संपूर्ण मालिकेत 25 विकेट घेतल्या, तर 127 धावाही ठोकल्या.

2) चेतेश्वर पुजारा

या कसोटी मालिकेत चेतेश्वर पुजारा तुफान फॉर्ममध्ये पाहायला मिळाला. पुजाराने एक द्विशतक ठोकलं. तर धर्मशाला कसोटीत त्याने पहिल्या डावात 57 धावा केल्या. मात्र दुसऱ्या डावात एक चोरटी धाव घेण्याच्या नादात शून्यावर बाद झाला. पुजाराने मालिकेत 405 धावा केल्या.

3) के एल राहुल

भारताचा सलामीवीर के एल राहुलने या मालिकेत 'मॅच्युअर इनिंग' खेळल्या. धर्मशाला कसोटीत पहिल्या डावात राहुलने 60 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात तो 51 धावा करुन नाबाद राहिला. राहुलने सलग अर्धशतकं झळकावण्याचा पराक्रम गाजवला.

4) उमेश यादव

भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवनेही धर्मशाला कसोटी जिंकण्यात मोलाचा वाटा उचलला. उमेश यादवने दुसऱ्या डावात 3 विकेट घेत भारताला महत्त्वाचे ब्रेक थ्रू मिळवून दिले. त्याला जाडेजा आणि अश्विनची उत्तम साथ लाभली. त्या दोघांनीही 3-3 विकेट घेतल्या. 

5) आर अश्विन

गोलंदाजी असो की फलंदाजी भारताचा संकटमोचक म्हणून आर अश्विन नेहमीच धावून आला आहे. अश्विनने धर्मशाला कसोटीत भारताला गरज असताना विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाचा संघ मोठ्या धावसंख्येकडे कूच करेल असं वाटत असतानाच, अश्विनने कर्णधार स्टीव्ह स्मिथचा काटा काढला.

6) कुलदीप यादव

निर्णायक धर्मशाला कसोटीत भारताचा कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्याच्याऐवजी भारताने फलंदाजाला संधी देण्याऐवजी चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला संधी दिली. कुलदीपने आपली निवड सार्थ ठरवत कांगारुंना 68 धावा देत 4 विकेट घेतल्या.

त्याच्या या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 300 धावात रोखण्यात यश आलं.