दिग्गज फुटबॉलर लियोनेल मेस्सीच्या खोलीमध्ये चोरी झाली आहे. विशेष म्हणजे जेव्हा मेस्सी पीएसजीसाठी फुटबॉल मॅच खेळत होते, त्याचवेळी चोरी झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यावेळी मेस्सीची पत्नी आणि तीन मुले देखील त्याच्यासोबत पॅरिस येथे होती. खोलीमध्ये कोणीच नसताना चोरांनी डाव साधला.


समोर आलेल्या माहितीनुसार, मेस्सी हॉटेलमधील ज्या खोलीत राहतो त्याचे छत तोडून चोरांनी खोलीत प्रवेश केला. चोरांनी जवळपास 30 लाख रुपयांचे सोने आणि रोकड चोरी केली आहे. ज्या हॉटेलमधून मेस्सीचे सामान चोरीला गेले त्या हॉटेलमध्ये मेस्सीने चार खोल्या घेतल्या होता. या चार खोल्यांचे दिवसाचे भाडे तब्बल 17 लाख रुपये आहे.


मेस्सीच्या खोलीच्या वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीच्या बालकनीचा दरवाजा खुला होता. या दरवाजातून चोरांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. मेस्सीच्या खोलीत चोरी केलेल्या दागिन्यांची किंमत 29.64 लाख रुपये तर  11.11 लाख रुपयांची रोकड चोरांनी चोरी केली आहे. 


जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून लियोनेल मेस्सीला ओळखले जाते. काही दिवसांपूर्वी मेस्सी बार्सिलोना क्लब सोडून पीएसजी क्लबमध्ये गेला होता. अद्याप मेस्सी आपल्या स्वत:च्या घरी देखील गेलेला नाही. 


हॉटेलने चोरीच्या घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी कुटुंबाच्या सुरक्षेत वाढ केली आहे. मॅनचेस्टर सिटी विरु्दध मिळवलेल्या विजयानंतर मेस्सी परतल्यानंतर क्रॅश बॅरिअर लावण्यात आले होते. समोर आलेल्या माहितीनुसार, मेस्सीने एक घर लीजवर घेतले आहे. लवकरच आपल्या परिवारासोबत मेस्सी तिथे राहयला जाणार आहे.