Lionel Messi GOAT Tour of India : फुटबॉलचा जादूगार आणि अर्जेंटिनाचा दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सी भारतात येताच चाहत्यांचा उत्साह शिखरावर पोहोचला आहे. तीन दिवसांच्या GOAT इंडिया टूर 2025 ची सुरुवात कोलकात्यापासून झाली असून शनिवारी पहाटे सुमारे अडीच वाजता मेस्सी कोलकात्यात पोहोचला. एअरपोर्टपासून सॉल्ट लेक स्टेडियमपर्यंत मेसीच्या स्वागतासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी उसळली होती. आपल्या लाडक्या स्टारची केवळ एक झलक पाहण्यासाठी चाहते रात्रभर जागून थांबले होते. 

Continues below advertisement

मेस्सीच्या या भारत दौऱ्यात कोलकात्यानंतर हैदराबाद, मुंबई आणि नवी दिल्ली या शहरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, हा लिओनेल मेस्सीचा 2011 नंतरचा भारतातील दुसरा दौरा आहे. यादरम्यान, मेस्सीच्या एका चाहत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्या चाहत्याने उघड केले की, त्यांनी नुकतेच लग्न केले होते, परंतु मेस्सीच्या आगमनाची बातमी कळताच त्यांनी त्यांचे हनिमून रद्द केले.

मेस्सी कोलकात्यात येताच हनिमून रद्द

Continues below advertisement

न्यूज एजन्सी एएनआयशी बोलताना या जोडप्यानं सांगितलं की, त्यांचं नुकतंच लग्न झालं असून हनीमूनसाठी सगळी तयारी पूर्ण झाली होती. मात्र, लिओनेल मेस्सी कोलकात्यात येणार असल्याची बातमी कळताच त्यांनी क्षणाचाही विचार न करता आपली ट्रिप रद्द केली. गेली 10–12 वर्षं आम्ही मेस्सीला फॉलो करत आहोत. त्याला प्रत्यक्ष पाहणं म्हणजे आमच्यासाठी स्वप्नपूर्ती असल्याचं या जोडप्यानं सांगितलं.

‘मेसीला पाहणं अधिक महत्त्वाचं...’

या मेस्सीप्रेमी चाहत्यांनी भावना व्यक्त करताना म्हटलं, “मेस्सी आमच्यासाठी फक्त एक खेळाडू नाही, तर तो हिरो आहे. त्याला एकदा तरी पाहणं आमच्यासाठी हनीमूनपेक्षा कितीतरी पटीने खास आहे. मेसीच्या भारत दौऱ्यामुळे कोलकाता अक्षरशः फुटबॉलमय झालं असून हॉटेल्सबाहेर, रस्त्यांवर आणि कार्यक्रमस्थळी चाहत्यांची प्रचंड गर्दी उसळलेली पाहायला मिळत आहे.

अवघ्या 5 मिनिटांत मेस्सी परत गेल्याने चाहते संतप्त

दरम्यान, कोलकात्यात लिओनेल मेस्सीला पाहण्यासाठी आलेल्या फुटबॉल चाहत्यांचा संताप उफाळून आला, ज्यामुळे सॉल्ट लेक स्टेडियममध्ये गोंधळ उडाला. राजकीय नेत्यांची गरजेपेक्षा जास्त उपस्थिती असल्याचा आरोप करत संतप्त चाहत्यांनी थेट स्टेडियमच्या स्टँडमधून मैदानात बाटल्या आणि खुर्च्या फेकण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे चित्र दिसू लागले. स्टेडियममधील बिघडलेली परिस्थिती पाहता मेस्सीला कडक सुरक्षेतून बाहेर काढण्यात आले आणि त्याला थेट हॉटेलकडे रवाना करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

हे ही वाचा - 

Lionel Messi VIDEO : लिओनेल मेस्सी भारतात आला, पण मैदानात तुफान राडा झाला; प्रेक्षक मैदानात घुसले, बाटल्या अन् खुर्च्या फेकत गोंधळ, स्टेडिअममध्ये नेमकं काय घडलं?