Nagpur News : नागपूर शहरात उपराजधानीला साजेशी स्वच्छता का राहत नाही? स्वच्छ शहरांच्या यादीत नागपूरचे स्थान सातत्याने घसरत का आहे? नागपूर शहरात रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा वेळीच का उचलला जात नाही? या सर्व प्रश्नांसंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूर महानगरपालिकेत (Nagpur Municipal Corporation Scam) सध्या 7,245 सफाई कर्मचारी कार्यरत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्यापैकी 2200 सफाई कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनाने वेगवेगळ्या कार्यालयीन कामासाठी वेगवेगळ्या विभागात नेमले आहे. त्यामुळे 2200 सफाई कर्मचारी सफाईच्या मूळ कामाऐवजी महापालिकेच्या शाळा, वाचनालय, टॅक्स विभाग, रुग्णालय, बांधकाम विभाग, वाहन चालक म्हणून काम करत आहे. भाजप आमदार प्रवीण दटके (Pravin Datke) यांनी माहितीच्या अधिकारात (Right to Information) (RTI) महापालिकेतील हा सफाई कर्मचारी घोटाळा उघडकीस आणला आहे.

Continues below advertisement

Pravin Datke: सफाई कर्मचारी घोटाळ्यामुळे नागपूर शहर स्वच्छ राहत नाही

भाजप आमदार प्रवीण दटके यांचा आरोप आहे की महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या याच सफाई कर्मचारी घोटाळ्यामुळे नागपूर शहर स्वच्छ राहत नाही, परिणामी स्वच्छतेच्या यादीत नागपूरचा आलेख सतत घसरता आहे. एवढ्यामोठ्या संख्येने शिक्षित असल्याच्या नावाखाली सफाई कर्मचाऱ्यांना स्वच्छतेच्या कामाऐवजी दुसऱ्या कामात वापरले जात असल्यामुळेच सफाई कर्मचाऱ्यांवरचा दबाव वाढतो आहे. नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहे. मात्र त्याबद्दल मनपा आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकारी संवेदनशील नसल्याचा आरोपही दटके यांनी केला आहे. जे सफाईं कर्मचारी शिक्षित आहे, म्हणून त्यांना इतर विभागात वापरायचे असेल तर त्यांना रीतसर लिपिक म्हणून वेगवेगळ्या विभागात जॉईन करून घ्यावं, आणि स्वच्छता विभागात त्यांच्या जागी अतिरिक्त सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, म्हणजेच दोन्हीकडे अडचण होणार नाही, असेही दटके म्हणाले.

Continues below advertisement

हे देखील वाचा