Lionel Messi Fans Angry In Kolkata : फुटबॉल विश्वातील महान खेळाडू लिओनेल मेस्सी भारतीय दौऱ्यावर आला आहे आणि कोलकात्यात त्याचं भव्य स्वागत झालं. मेस्सी आज सॉल्ट लेक स्टेडियममध्ये दाखल झाला. सुरुवातीला सन्मान सोहळा पार पडला, मात्र हा सोहळा अपेक्षेपेक्षा फारच कमी वेळेचा झाला. अवघ्या काही मिनिटांतच मेस्सी स्टेडियममधून निघून गेल्याने उपस्थित चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली.
लिओनेल मेस्सी भारतात आला, पण मैदानात तुफान राडा झाला
मेस्सीला प्रत्यक्ष पाहण्यासाठी हजारो चाहते स्टेडियममध्ये जमले होते. अनेकांनी तिकिटांसाठी हजारो रुपये खर्च केले होते. मात्र मेस्सी मैदानात फार वेळ न थांबल्याने चाहते संतप्त झाले. यानंतरच परिस्थिती हाताबाहेर गेली.
स्टेडियममध्ये गोंधळ, खुर्च्या आणि बाटल्या फेकल्या
मेस्सी निघून गेल्यानंतर सॉल्ट लेक स्टेडियममध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त चाहत्यांनी मैदानात घुसण्याचा प्रयत्न केला. काहींनी खुर्च्या आणि बाटल्या फेकत निषेध व्यक्त केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चाहत्यांचा संताप! “पैसे वाया गेले....”
या घटनेनंतर चाहत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. एका चाहत्याने सांगितले, “ही खूप निराशाजनक घटना आहे. मेस्सी फक्त 10 मिनिटांसाठी आला. त्याच्याभोवती फक्त राजकारणी आणि मंत्री होते. आम्हाला काहीच दिसले नाही. त्याने एकही किक घेतली नाही. इतके पैसे आणि वेळ वाया गेल्या.” तर दुसऱ्या चाहत्याने म्हटले, “मेस्सीभोवती फक्त राजकारणी आणि अभिनेते होते. मग आम्हाला का बोलावले? आम्ही 12,000 रुपयांचे तिकीट घेतले, पण त्याचा चेहराही नीट दिसला नाही.”
आयोजनावर प्रश्नचिन्ह
या संपूर्ण प्रकरणामुळे आयोजकांच्या नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मेस्सीसारख्या दिग्गज खेळाडूच्या कार्यक्रमासाठी अपेक्षा प्रचंड होत्या, मात्र त्या पूर्ण न झाल्याने चाहत्यांचा संताप उफाळून आला. मेस्सीचा भारत दौरा ऐतिहासिक ठरण्याची अपेक्षा होती, पण कोलकात्यातील हा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आता या गोंधळावर आयोजक आणि प्रशासन काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा -