न्यू जर्सी : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लायनल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. कोपा अमेरिका स्पर्धेच्या फायनलमधील पराभवानंतर निवृत्तीचा निर्णय घेतल्याचं मेस्सीने सांगितलं.

 

लायनेल मेसीचं स्वप्न पुन्हा भंगलं

पाच वेळा जगातल्या सर्वोत्तम फुटबॉलपटूचा मान मिळवणाऱ्या लायनेल मेसीचं विजेतेपद मिळवण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. मेसीने व्यावसायिक फुटबॉलमध्ये जवळपास सर्वच विजेतेपदं मिळवण्याचा पराक्रम गाजवला आहे. पण अर्जेंटिनासाठी मात्र त्याला अजूनही विजेतेपद मिळवता आलेलं नाही. त्यामुळे पेले आणि मॅराडोना यांच्या पंक्तीत मेसीला स्थान द्यायचं की नाही असा प्रश्न पुन्हा एकदा विचारला जाऊ लागला आहे.

अर्जेंटिनाला सलग तिसऱ्या वर्षी एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. याआधी 2014 साली झालेल्या फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये जर्मनीने अर्जेंटिनाला 1-0 असं हरवलं होतं. त्यानंतर गेल्या वर्षी कोपा अमेरिकात अर्जेंटिनाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. यंदाही कोपा अमेरिकात अर्जेंटिनाची झोळी रिकामीच राहिली. अर्जेंटिनाला 1993 च्या कोपा अमेरिकानंतर आजवर एकही मोठी स्पर्धा जिंकता आलेली नाही.