मॉस्को : अर्जेंटिनाचा लायनेल मेसी आणि पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो या दोन बड्या फुटबॉलवीरांचं फिफा विश्वचषकाचं स्वप्न अखेर अधुरंच राहिलं. मेसीच्या अर्जेंटिनाचं आणि रोनाल्डोच्या पोर्तुगालचं आव्हान विश्वचषकाच्या उपउपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आलं.
रशियातला विश्वचषक हा मेसी आणि रोनाल्डोच्या कारकीर्दीतला चौथा विश्वचषक होता. मेसी आज 31 वर्षांचा, तर रोनाल्डो 33 वर्षांचा आहे. त्यामुळे आगामी विश्वचषकात ते दोघं खेळतील का, याविषयी शंकाच आहे.
उरुग्वेकडून पोर्तुगालचा पराभव
दियागो गॉडिनच्या उरुग्वेने ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालचा 2-1 असा पराभव करून, फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. या सामन्यात एडिन्सन कॅवानी हा उरुग्वेच्या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला.
त्यानेच उरुग्वेच्या दोन्ही गोल्सची नोंद केली. लुई सुआरेझने सातव्या मिनिटाला दिलेल्या पासवर कॅवानीने हेडरवर उरुग्वेचं खातं उघडलं. मग पेपेनेही हेडरवरच 55 व्या मिनिटाला पोर्तुगालला बरोबरी साधून दिली. पण कॅवानीने सात मिनिटात दुसरा वैयक्तिक गोल डागून उरुग्वेला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. उरुग्वेच्या पोलादी बचावाने ती आघाडी अखेर निर्णायक ठरवली.
फ्रान्सकडून अर्जेंटिनाला कडवी झुंज
फ्रान्स जिंकला. अर्जेंटिना हरली. पण या सामन्यातल्या सात गोल्सनी आणि उभय संघांच्या फुटबॉलकौशल्याने जगभरच्या क्रीडारसिकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. रशियातल्या फिफा विश्वचषकाच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सने गतवेळच्या उपविजेत्या अर्जेंटिनाचा कडवा संघर्ष 4-3 असा मोडून काढला. पण या सामन्यात सरशी ही फुटबॉलची झाली.
या सामन्यात कर्णधार ग्रिझमनने तेराव्या मिनिटाला फ्रान्सचं खातं उघडलं. त्याने पेनल्टीवर गोलची नोंद केली. मग एंजल डी मारियाने 41 व्या मिनिटाला अर्जेंटिनाला बरोबरी साधून दिली.
उत्तरार्धात 48 व्या मिनिटाला मेसीच्या शॉटवर मर्काडोने अर्जेंटिनाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर या सामन्यावर फ्रान्सने वर्चस्व गाजवलं. पॅवार्डने 57 व्या मिनिटाला फ्रान्सला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. मग किलियान एमबापेने चार मिनिटांत दोन गोल डागून फ्रान्सची आघाडी 4-2 अशी वाढवली.
अर्जेंटिनाच्या सर्जियो अॅग्वेरोने एन्जुरी टाईममध्ये गोल झळकावून फ्रान्सची आघाडी 4-3 अशी कमी केली. पण तोवर खूप उशीर झाला होता. फ्रान्सने 4-3 असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.