नवी दिल्ली : सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी उत्तम राहिली आहे. मंगळवारी (काल) झालेल्या बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून भारताने उपांत्यफेरीचे तिकीट मिळवले आहे. परंतु या स्पर्धेत भारताचा माजी कर्णधार आणि जगातला सर्वोत्तम मॅचफिनिशर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने त्याच्या लौकिकाला साजेशी खेळी केलेली नाही. त्यामुळे अनेक क्रिकेटरसिक चिंतेत आहेत.

काल झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही धोनीने 33 चेंडूत 35 धावांची खेळी केली. या लढतीत रोहित शर्माचे शतक तर लोकेश राहुलने 77 धावांची खेळी करून संघाला 180 धावांची सलामी दिली. त्यानंतर ऋषभ पंतने 48 धावांची आक्रमक खेळी करुन दिली. त्यामुळे भारतीय संघ 350 धावांचा टप्पा सहज पार करेल असे वाटत होते. परंतु अखेरच्या षटकात धोनी पुन्हा एकदा संथ खेळला. त्यामुळे भारताला मोठी धावसख्या उभारता आली नाही.

धोनीच्या विश्वचषक स्पर्धेतील प्रदर्शनावर त्याचे चाहतेदेखील नाराज आहेत. धोनी पूर्वीसारखा खेळत नसल्यामुळे त्याच्या टीकाकारांनादेखील त्याच्याविरोधात बोलण्याची आयती संधी मिळाली आहे. "धोनी त्याच्या लौकीकाप्रमाणे खेळत नाही, धोनी खूप धिम्या गतीने खेळू लागला आहे, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेटप्रमाणे खेळतोय," अशी टीका त्याच्यावर सुरु आहे. तर अनेकांनी धोनीला निवृत्त होण्याचा सल्ला दिला आहे.

याबाबत धोनीच्या जवळच्या मित्रांनी धोनीशी बातचित केली. यावर माही म्हणाला की, "फलंदाजी कशी करायची, यष्टीरक्षण (विकेटकीपिंग) कसं करायचं हे जितकं चांगलं मला कळतं, तितकंच मला निवृत्त कधी व्हायचं हेदेखील कळतं."

2017 मध्येच धोनीच्या निवृत्तीची मागणी होत होती. त्यानंतर धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर विराट कोहलीला भारतीय संघाचा कर्णधार बणवण्यात आले. परंतु कोहली आणि धोनीच्या सहकाऱ्यांनीच धोनीला काही काळ संघासोबत राहण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून धोनी 2019 च्या विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्त होईल असे बोलले जात आहे.

खेळ माझा : कॅप्टन कूल धोनी खरंच रिटायर होतोय?



दरम्यान धोनी विश्वचषक स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची बातमी काही इंग्रजी वृत्तपत्रांनी दिली आहे. स्पर्धेतील अखेरचा सामना खेळल्यानंतर धोनी क्रिकेटला रामराम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या वृत्ताला अद्याप धोनी किंवा बीसीसीआयकडून दुजोरा देण्यात आलेला नाही.

परंतु, निवृत्तीसाठी धोनीच्या घरच्या मैदानावर एक सामना खेळवण्यात येईल, अशीदेखील चर्चा सुरु आहे. परंतु भारताने विश्वचषक जिंकला, तर तोच सामना धोनीचा अखेरचा सामना ठरेल, असे म्हटले जात आहे. धोनीच्या निवृत्तीसाठी हीच उत्तम वेळ असेल, असेही काही निकटवर्तीयांनी धोनीला सुचवले आहे.

धोनीची विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी
दक्षिण आफ्रिका – 34 धावा (46 चेंडू)
ऑस्ट्रेलिया – 27 धावा (14 चेंडू)
पाकिस्तान – 1 धाव (2 चेंडू)
अफगाणिस्तान – 28 धावा (52 चेंडू)
वेस्ट इंडीज – नाबाद 56 धावा (61 चेंडू)
इंग्लंड – नाबाद 46 धावा (31 चेंडू)
बांग्लादेश – 35 धावा (33 चेंडू)

 आपल्या षटकारानं दुखापतग्रस्त झालेल्या 'त्या' चाहतीला रोहित शर्माकडून कॅप भेट | ABP Majha



87 वर्षांच्या आजीने कोहली आणि रोहितचा घेतला लाडाने मुका | ABP Majha