जम्मू काश्मीर : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुन्हा एका सैन्याच्या वर्दीत दिसणार आहे. धोनीने जम्मू काश्मीरमध्ये प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे. धोनी पॅरा रेजिमेंटच्या 106 पॅरा टेरिटोरियल आर्मी बटलियनचा भाग आहे. तो 31 जुलैपासून 15 ऑगस्टपर्यंत युनिटसोबत काश्मीरमध्ये प्रशिक्षण घेणार आहे. हे युनिट व्हिक्टर फोर्सचा भाग आहे. या ट्रेनिंगदरम्यान धोनी पेट्रोलिंग, गार्ड आणि पोस्टची ड्यूटी करणार आहे. यावेळी जवान त्याच्यासोबतच असतील. भारतीय सैन्याने याची माहिती दिली.


आपण वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी उपलब्ध नाही, असं धोनीने आधीच बीसीसीआयला कळवलं होतं. त्यामुळे या दौऱ्यासाठी त्याची भारतीय संघात निवड झालेली नाही. त्याच्या जागी रिषभ पंतकडे यष्टीरक्षकाची जबाबदारी पार पाडेल. धोनीने दोन महिन्यांची सुट्टी घेतली आहे. यादरम्यान तो भारतीय सैन्यात आपली सेवा देईल. भारतीय टेरिटोरियल आर्मीने 2011 मध्ये धोनीला लेफ्टनंट कर्नल ही मानद पदवी दिली होती.

लेफ्टनंट कर्नल धोनीबाबत भारतीय सैन्याने माहिती दिली की, "तो पॅरा रेजिमेंटचा भाग असेल. धोनी 106 टेरिटोरियल आर्मी बटालियन (पॅरा) सोबत 31 जुलैपासून 15 ऑगस्टपर्यंत राहिल. हे युनिट काश्मीरमध्ये असून व्हिक्टर फोर्सचा भाग आहे. यादरम्यान त्याच्यावर पेट्रोलिंग, गार्ड आणि पोस्टची ड्यूटी असेल. शिवाय तो जवानांसोबतच राहिल."

2019 च्या विश्वचषकानंतर धोनी क्रिकेटला अलविदा करेल असी चर्चा रंगली होती. परंतु सैन्यात काम करण्याची इच्छा असल्याची विनंती धोनीने केली होती. सैन्याने त्याची विनंती मान्य केली असून तो लवकरच सीमेवर गस्त घालण्याचं काम करेल. दरम्यान, धोनीने आतापर्यंत 350 वनडे आणि 98 ट्वेण्टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 10 हजार 773 धावांची नोंद आहे.