मुंबई : राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांच्यापाठोपाठ माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळही शिवसेनेच जाणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. या वृत्ताचं खंडन करत या अफवा असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं. 27 जुलैला भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती.


मी शिवसेनेत प्रवेश करणार आहे, या बातम्या खोट्या आहेत. मी शिवसेनेत प्रवेश करण्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. सचिन अहिर आणि माझा मुळचा मतदारसंघ भाखयळा जवळ असल्याने या चर्चा सुरु झाल्या असाव्या, असा अंदाज छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.




सचिन अहिर शिवसेनेत

राष्ट्रावादीचे नेते आणि माजी मंत्री सचिन आहिर यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादी पक्ष सोडताना फार आनंद होत नाही, मात्र काही वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात, अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी दिली आहे. बाळासाहेब ठाकरे याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेत आलो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न करणार नाही, मात्र शिवसेना पक्ष वाढवण्याचा काम करणार आहे, असं सचिन अहिर म्हणाले.



आमदार वैभव पिचड भाजपच्या वाटेवर?


दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे पुत्र आणि आमदार वैभव पिचड भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपासून आमदार वैभव पिचड यांच्या बंडखोरीची चर्चा रंगली होती. त्यातच त्यांनी बुधवारी (24 जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'वर्षा' बंगल्यावर भेट घेतली. या भेटीच्या वेळी नुकतेच भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपस्थित होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वैभव पिचडही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे.


संबंधित बातम्या