मुंबई : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खूप मेहनत घेतली. वयाच्या 78व्या वर्षी 75हून अधिक सभा घेतल्या. पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत 15 जागा जिंकण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने केली. पण 23 मे रोजी मात्र राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसला. राष्ट्रवादीच्या पाच जागा निवडून आल्या. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोहिते पाटील, जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपचा  मार्ग पत्करला आणि विधान सभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी भाजप आणि शिवसेनेमध्ये जाण्याची तयारी केली.


लोक जाणार याची पक्ष प्रमुखांना कल्पना होती. पण आज मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या जाण्याने मात्र राष्ट्रवादीला धक्का बसला. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अवघे तीन नेते आहेत. सचिन अहिर, संजय दीना पाटील आणि नवाब मलिक, संजय दीना पाटील हे नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हरले. नवाब मलिक यांना पक्षात दुर्लक्षित केले जात आहे तर मुंबई अध्यक्ष असून सचिन अहिर इतके दिवस गायब होते. नुकताच शिवसेनेच्या विरोधात सचिन अहिर यांनी पार्किंगच्या दरांवरुन आंदोलन केलं होतं.
जयंत पाटील यांचे विश्वासू असे सचिन अहिर हे गेले अनेक वर्षे पक्षात मुंबईला अध्यक्ष पदावर आहेत. त्यांना महामंडळ आणि मंत्री पद देखील राष्ट्रवादीने दिले. आज सचिन अहिर जाणार या बतमीनंतर बोलायला काहीच न उरल्याने राष्ट्रवादीचे नेते संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले.

वरिष्ठ नेत्यांनी राजकारणात या गोष्टी होतात, त्याला इतकं महत्व द्यायचं कारण नाही सांगत विषय टाळला. अजित पवार यांनी सचिन अहिर यांच्या शिवसेनेच्या प्रवेशाबाबत जयंत पाटील यांच्या जवळचे असल्यामुळे त्यांच्याकडे बोट दाखवून जबाबदारी झटकली. तर जयंत पाटील यांना वारंवार संपर्क करुनही काहीच उत्तर दिलं नाही. त्यामुळे सचिन अहिर यांच्या जाण्याने काय धक्का बसला हे स्पष्ट दिसत होतं. काल रात्रीपासून सचिन अहिर शिवसेनेत जाणार कळल्यापासून माध्यमांना टाळण्यासाठी जयंत पाटील यांनी आज पहाटे मुंबई सोडली आणि इस्लामपूरचा रस्ता पकडला.

नेते प्रसारमाध्यमांना टाळत असले तरी पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये मात्र मध्यरात्रीपासून चर्चा होती. सचिन भाऊ असे  का वागले? सचिन अहिर यांचा शिवसेना प्रवेश म्हणजे 'झोपलेल्या माणसाच्या डोक्यात दगड घातल्याची भावना' कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. पक्षाने काय दिलं नाही या नेत्यांना आणि हे असे निघून जातात, असा सवालही काहींनी केला. इतकी वर्ष मुंबईची जबाबदारी देऊन ही सचिन अहिर यांनी मुंबईत पक्ष का वाढवला नाही याचं उत्तर आज मिळालं अशी एक खोचक प्रतिक्रिया ही ऐकायला मिळाली.

आगामी काळात मीच वरळीचा आमदार असेन : सुनील शिंदे

सचिन अहिर यांच्या प्रवेशानंतर नवाब मलिक यांनी मात्र ट्विटवरुन मार्मिक प्रतिक्रिया दिली..

जो जिंदा होते हैं वह प्रवाह के विरुद्ध तैरते हैं,
मुर्दा लोग पानी के साथ बह जाते हैं।
साथियों जिंदा हो तो जिंदा नज़र आना ज़रूरी है।
जयहिंद जय राष्ट्रवाद।


एकूणच लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला असताना सर्व पद भूषवलेले नेते असे जाणे म्हणजे पक्षाला घरघर लागण्याचं चिन्ह आहे.