मुंबई : भारताचा दुहेरीतला सध्याचा अव्वल टेनिसपटू रोहन बोपण्णानं भारताच्या डेव्हिस चषक संघात पुनरागमन केलं असलं तरी अनुभवी लिअँडर पेसनंही या संघातलं आपलं स्थान कायम राखलं आहे. डेव्हिस चषकाच्या आशिया ओशनिया गटात भारताची आगामी लढत ही उझबेकिस्तानशी होणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या गत लढतीसाठी रोहन बोपण्णाचा भारतीय संघात समावेश करण्यात आला नव्हता.

नुकत्याच झालेल्या दुबई ड्यूटी फ्री टेनिस स्पर्धेत रोहन बोपण्णा आणि मार्सिन मॅट्कोवस्कीनं लिअँडर पेस आणि गार्सिया गिलेर्मो लोपेझचं आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आणलं होतं. त्यामुळं साहजिकच डेव्हिस चषकाच्या लढतीत पेसच्या साथीनं आता रोहन बोपण्णा खेळताना दिसेल.

युकी भांबरी आणि रामकुमार रामनाथन हे दोघंही एकेरीत भारताचं प्रतिनिधित्व करतील. डेव्हिस चषकाच्या या लढतीच्या निमित्तानं भारतीय संघाचा नॉन प्लेईंग कॅप्टन ही जबाबदारी पहिल्यांदाच महेश भूपतीच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.