India vs England 5th Test, Dharamsala : धरमशाला येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटीवरही टीम इंडियाने आपली पकड घट्ट केली आहे. इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या 218 धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 8 गडी गमावून 473 धावा केल्या. टीम इंडियाची आघाडी 255 धावांची आहे. जसप्रीत बुमराह 55 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 19 धावा करून नाबाद तर कुलदीप यादव 55 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 27 धावा काढून नाबाद माघारी परतला. भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतके झळकावली. तर इंग्लंडकडून ऑफस्पिनर शोएब बशीरने चार विकेट घेतल्या.






भारताच्या टाॅप पाच फलंदाजांकडून 50 पेक्षा जास्त धावा 


पाचव्या कसोटीत भारताच्या आघाडीच्या पाच फलंदाजांनी 50 हून अधिक धावा केल्या. यामध्ये रोहित शर्माने 103 धावांची तर शुभमन गिलने 110 धावांची खेळी केली. यशस्वी जैस्वालने 57 धावा, नवोदित देवदत्त पडिक्कलने 65 आणि सर्फराज खानने 56 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या 15 वर्षांत प्रथमच भारताच्या पहिल्या पाच फलंदाजांनी 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.




सर्फराज आणि पडिक्कल यांच्यात 97 धावांची भागीदारी


रोहित 162 चेंडूत 13 चौकार आणि 3 षटकारांसह 103 धावा करून बाद झाला. शुभमन गिल 150 चेंडूत 110 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. गिलने 12 चौकार आणि 5 षटकार मारले. हे दोघेही बाद झाल्यानंतर पहिली कसोटी खेळत असलेल्या देवदत्त पडिक्कल आणि सरफराज खानने जबाबदारी स्वीकारली. दोघांनी 97 धावांची भागीदारी केली. सरफराजने 60 चेंडूंच्या खेळीत 8 चौकार आणि 1 षटकार ठोकला. तर पडिक्कल 103 चेंडूत 65 धावा करून बाद झाला. त्याने 10 चौकार आणि एक षटकार मारला. तर रविचंद्रन अश्विन आपल्या 100व्या कसोटीत शून्यावर बाद झाला.


बुमराह आणि कुलदीपने इंग्लंडला चकवले


428 धावांवर 8 विकेट पडल्यानंतर कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनीही इंग्रजांचा पराभव केला. दोघांनी 9व्या विकेटसाठी 108 चेंडूत 45 धावांची भागीदारी केली. टीम इंडिया आजच ऑलआऊट होईल असे वाटत होते, पण बुमराह आणि कुलदीपने तसे होऊ दिले नाही. या दोघांनी फिरकीपटूंबरोबरच इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांचाही सामना केला. 


इतर महत्वाच्या बातम्या