आयसीसीच्या वन डे रँकिंगमध्ये विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेच्या ए बी डीव्हिलियर्सला मागे टाकत, नंबर वन स्थान पटकावलं आहे.
एकीकडे विराट कोहलीने पहिला क्रमांक मिळवला असतानाच, टीम इंडियाचं वेगवान अस्त्र जसप्रीत बुमराने रँकिंगमध्ये कमालीची झेप घेतली. बुमराह गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
भारत आणि न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश, आणि पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील मालिकेनंतर आयसीसीने वन डे रँकिंग जाहीर केलं.
कोहलीला सर्वाधिक गुण
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत दोन शतकं ठोकणाऱ्या कोहलीने रँकिंगमध्ये सर्वाधिक 889 गुण मिळवले. रँकिंगमध्ये भारतीय फलंदाजाने मिळवलेले हे आतापर्यंतचे सर्वाधिक गुण आहे. यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 1998 मध्ये सर्वाधिक 887 गुण मिळवत अव्वल स्थान पटकावलं होतं.
कोहलीने वानखेडेवर 121 आणि कानपूर वन डेत 113 धावा ठोकल्या, तर तीन सामन्यांच्या मालिकेत एकूण 263 धावा ठोकल्या.
पहिल्या दहा जणांमध्ये कोहलीशिवाय एकमेव रोहित शर्मा आहे. रोहित शर्मा वन डे रँकिंगमध्ये सातव्या स्थानावर तर महेंद्रसिंह धोनी अकराव्या स्थानी आहे.
बुमरा तिसऱ्या स्थानी
दरम्यान, वन डे गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराने तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. गोलंदाजांमध्ये पाकिस्तानचा हसन अली 759 गुणांसह पहिल्या क्रमांकावर, तर दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहीर 743 गुणांसह दुसऱ्या क्रमांकवर आहे. त्यापाठोपाठ बुमरा 719, जोस हेजलवूड (714) आणि केगिसो रबाडा (708) हे अनुक्रमे तीन, चार आणि पाचव्या नंबरवर आहेत.
वन डे रँकिंग – फलंदाज
- विराट कोहली (भारत) – 889 गुण
- एबी डिव्हिलियर्स (द. आफ्रिका) – 872
- डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)- 865
- बाबर आझाम (पाकिस्तान) – 846
- क्विंटन डी कॉक (द. आफ्रिका) - 808
वन डे रँकिंग – गोलंदाज
- हसन अली (पाकिस्तान) – 759
- इम्रान ताहीर (दक्षिण आफ्रिका)- 743
- जसप्रीत बुमरा (भारत) – 719
- जोस हेजलवूड (ऑस्ट्रेलिया) -714
- केगिसो रबाडा –(द. आफ्रिखा) - 708