कोलंबो : श्रीलंका संघातून बाहेर असलेला वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या आगामी तिरंगी मालिकेसाठीही त्याची निवड करण्यात आलेली नाही.
''एक खेळाडू म्हणून संघाला माझी गरज नसेल तर पुढे जाण्याची हीच वेळ आहे. आणखी काही वर्ष मी क्रिकेट खेळू शकतो. मात्र खेळाडू म्हणून संघात माझी काहीच भूमिका नसेल तर पुढच्या विश्वचषकासाठी मेंटॉर म्हणून संघासोबत जाण्यास तयार आहे,'' असं मलिंगा म्हणाला. ‘संडे टाइम्स’शी तो बोलत होता.
आयपीएल लिलावात मलिंगावर एकाही फ्रँचायझीने बोली लावली नाही. गेल्या मोसमात तो मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. मात्र त्याची कामगिरी त्याच्या लौकिकाला साजेशी नव्हती.
34 वर्षीय मलिंगा सप्टेंबर 2017 मध्ये अखेरचा मैदानात उतरला होता. आपल्या यॉर्करने फलंदाजांना धडकी भरवणारा मलिंगा गेल्या काही वर्षांपासून फॉर्मसाठी संघर्ष करत आहे.
मलिंगाने श्रीलंकेकडून 30 कसोटी, 204 वन डे आणि 68 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटीत 101, वन डेत 301, तर टी-20 मध्ये त्याच्या नावावर 90 विकेट आहेत.