नवी दिल्ली : आयपीएलच्या अकराव्या मोसमात उतरण्यासाठी सर्व संघांनी तयारी सुरु केली आहे. संघांची बांधणीही सुरु आहे. जवळपास सर्वच संघ यावेळी नव्या समीकरणांसह मैदानात उतरणार आहे. अनेक संघांची धुरा नवख्या खेळाडूंच्या खांद्यावर पाहायला मिळणार आहे.


किंग्ज इलेव्हन पंजाबनेही स्टार स्पिनर आर. अश्विनला कर्णधार म्हणून घोषित केलं. पहिल्यांदाच या संघात खेळणाऱ्या अश्विनवर कर्णधारपदाची जबाबदारी देऊन संघ व्यवस्थापनाने मोठी चाल खेळली.

पंजाबच्या संघात युवराज सिंह, डेव्हिड मिलर यांच्यासारखे अनुभवी खेळाडू असताना कर्णधार म्हणून अश्विनची निवड करण्यात आली. अश्विन यापूर्वी आयपीएलच्या 8 मोसमांमध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळला आहे, तर दोन वेळा रायझिंग पुणे सुपरजायंटचं प्रतिनिधित्व त्याने केलं आहे.

युवराजपेक्षा जास्त विश्वास अश्विनवर का दाखवला, याचं उत्तर पंजाबचा मेंटॉर वीरेंद्र सेहवागने फेसबुक लाईव्हद्वारे दिलं. ''जवळपास 90 टक्के चाहत्यांची पहिली पसंत युवराज होता. मात्र मला माझा कर्णधार वेगळा हवा होता,'' असं म्हणत अश्विनच कर्णधार पाहिजे होता हे वीरुने अप्रत्यक्षपणे स्पष्ट केलं.

''सपोर्ट स्टाफ आणि संघ मालकाची मतंही अश्विनच्या बाजूने होती आणि एक गोलंदाज चांगला कर्णधार होऊ शकतो,'' असं वाटल्याचं सेहवागने सांगितलं. युवराज चांगला मित्र आहे, मात्र क्रिकेटमध्ये मैत्री येत नाही, असंही सांगायला सेहवाग विसरला नाही.

जानेवारीमध्ये झालेल्या आयपीएल लिलावात पंजाबने 7.6 कोटींची बोली लावत अश्विनची खरेदी केली होती.