औरंगाबाद : गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेनेची महापालिकेत सत्ता असलेल्या औरंगाबाद शहरात सध्या नागरिकांना श्वास घेणंही कठीण झालं आहे. कारण, गेल्या 13 दिवसांपासून शहरातून कचरा उचलला गेलेला नाही. सलग 13 दिवसांपासून कचराकोंडी कायम आहे.


औरंगाबादपासून 15 किलोमीटरवर असलेल्या नारेगावच्या कचरा डेपोत सध्या कचरा टाकला जातो. मात्र, तिथल्या ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास विरोध केल्याने मोठा पेच निर्माण झालाय. कचऱ्यावर कुठलीही प्रक्रिया होत नसल्याने आणि त्याची विल्हेवाट नीट लावली जात नसल्याने रोगराई आणि घाणीचं साम्राज्य वाढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या पेचामुळे औरंगाबादचं आरोग्य धोक्यात आलेलं असतानाही आमदार इम्तियाज जलील, अतुल सावे, संजय शिरसाठ आणि खासदार चंद्रकांत खैरे मात्र निश्चिंत आहेत.

विशेष म्हणजे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आज नारेगावच्या ग्रामस्थांशी होणाऱ्या चर्चेत विभागीय आयुक्तांना यश मिळतं का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.