बंगळुरुः भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा हाती घेतल्यानंतर अनिल कुंबळे आता रणनिती आखण्यासाठी सज्ज झाला आहे. कुंबळेने आज बंगळुरुमध्ये भारताचा वन डे कर्णधार महेंद्र सिंह धोनी, अंडर 19 संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड, कसोटी कर्णधार विराट कोहली आणि राष्ट्रीय अकादमींचे प्रशिक्षक यांना बैठकीसाठी आमंत्रित केलं आहे.

 

केवळ कसोटीच नव्हे तर भारताला सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये अव्वलस्थानी आणण्याचा विडा कुंबळेने उचलला आहे. आजच्या बैठकीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडून रणनिती ठरवायची आहे.

 

काय आहे बैठकीचा उद्देश?

या बैठकीसाठी सिनिअर आणि ज्युनिअर संघ निवड करणाऱ्या समित्या देखील उपस्थित असणार आहेत. कुंबळे सर्वांना संबोधित करणार आहे. तसंच प्रत्येकाला आपलं मत मांडण्याची संधी मिळणार आहे. भारताचा अंडर 19 संघ आणि भारत 'अ' या संघांना मजबूत करण्याची कुंबळेची ईच्छा आहे.

 

भारतातील क्रिकेट अकादमींनी सुद्धा अधिक दर्जेदार बनावं, अशी कुंबळेची ईच्छा आहे. ही बैठक त्याच दृष्टीने उचललेलं पहिलं पाऊल आहे, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

 

विराटसाठी जम्बो प्लॅनिंग

भारताला येत्या काळात 17 कसोटी सामने खेळायचे आहेत. यापैकी कमीत कमी 15 सामने जिंकण्याचा कुंबळेने निर्धार केला आहे. यासाठी भारताला दर्जेदार युवा खेळाडूंची गरज आहे. त्यामुळे विराट कोहलीसोबत कुंबळे असा प्लॅन करत आहे, ज्यामुळे टीम इंडिया अव्वलस्थानी कायम राहिल.

 

भारतीय क्रिकेटमध्ये अशा प्रकारचं दूरदृष्टीचं नियोजन कदाचित पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. कुंबळे प्रत्येक खेळाडूवर वैयक्तिक लक्ष ठेवून आहे. त्यामुळे खेळाडूंचा देखील उत्साह पाहण्यासारखा आहे. कुंबळेच्या या दूरदृष्टीचा फायदा येत्या काळात नक्की पाहायला मिळेल अशी आशा आहे.

 

संबंधित बातम्याः


अनिल कुंबळेची फुटबॉल बंदी विराटनं झुगारली?


धोनी आणि कोहली दोघांनाही सारखंच महत्त्व : कुंबळे


आमच्या कुणाहीपेक्षा खेळाडू अधिक महत्त्वाचे: अनिल कुंबळे


प्रशिक्षकपद स्वीकारण्यापूर्वी कुंबळेचा धोनी, कोहलीला मेसेज