कोकणात मुसळधार, महाराष्ट्रात कुठे किती पाऊस?
एबीपी माझा वेब टीम | 03 Jul 2016 03:04 AM (IST)
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातही पावसानं जोर धरला आहे. खेड शहर आणि परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय. खेडमधल्या सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय. यंदा पूर्व महाराष्ट्रातून एन्ट्री घेतलेल्या पावसानं कोकणात पोहोचायला थोडा उशीर केला. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसानं चांगलाच जोर धरल्यानं कोकणवासी सुखावलेत. रत्नागिरीप्रमाणे रायगड आणि सिंधुदुर्गामध्येही पाऊस धो-धो बरसतोय. पुण्यातही पावसाला जोर काल-परवापर्यंत पाठ फिरवलेल्या पावसानं पुण्यातही हजेरी लावलीय. पुण्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. काल दुपारी पावसाच्या तुरळक सरी अंगावर घेण्याची संधी पुणेकरांनी सोडली नाही. विशेष म्हणजे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात काल समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे तळ गाठलेल्या धरणांची पातळी काही प्रमाणात वाढलीय. कोल्हापूरचा राजाराम बंधारा पाण्याखाली कोल्हापूरचा राजाराम बंधारा यावर्षी पहिल्यांदाच पाण्याखाली गेलाय. शनिवारी सायंकाळी 5 वाजता हा बंधारा पाण्याखाली गेला. या ठिकाणी सध्या 17 फूट पाणी पातळी आहे. या बंधाऱ्यावरील पाणी पातळीवरूनच जिल्हा प्रशासन पुरस्थितीचा अंदाज बांधते. या ठिकाणी 39 फूट पाणी पातळी झाल्यास नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. तर 43 फूट पाणी हे धोक्याची पातळी समजली जाते. जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे. नगरकडे पावसाची पाठ जून उलटला तरी अहमदनगर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे भंडारदरा आणि निळवंड धरणामध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. भंडारदरामध्ये अर्धा टीएमसी तर निळवंडेमध्ये अर्ध्या टीएमसीपेक्षा कमी पाणीसाठा आहे. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. तर खरीपाची पिकंही धोक्यात आली आहेत.