मुंबई : इंग्लंडविरुद्ध सुरु होत असलेल्या टी-ट्वेण्टी मालिकेआधी बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदर जमखी झाल्याने भारतीय संघाला धक्का बसला. आता या दोघांच्या जागी दोन युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे.


जसप्रीत बुमराहच्या जागी नवख्या दीपक चहरला तर वॉशिंग्टन सुंदरच्या जागी अष्टपैलू कृणाला पंड्याचा टी-ट्वेण्टी संघात समावेश करण्यात आला आहे. वॉशिंग्टन सुंदरचा इंग्लंडविरुद्धच्या वनडे संघातही समावेश असल्याने वनडे संघात त्याच्या जागी फिरकीपटू अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे.

वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि धडाकेबाज अष्टपैलू कृणाल पंड्याने आयपीएल आणि इंग्लंडमध्ये ‘इंडिया ए’ संघाकडून खेळताना दमदार कामगिरी केली होती. या जोरावरच त्यांना भारताकडून खेळण्याची संधी देण्यात आली आहे.

दरम्यान, आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-ट्वेण्टी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना बुमराहला हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. तर सरावादरम्यान फुटबॉल खेळताना वॉशिंग्टन जखमी झाला होता.

इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची तीन सामन्यांची टी-ट्वेण्टी मालिका 3 जुलैला तर वनडे मालिका 12 जुलैला सुरु होणार आहे.

टी-ट्वेण्टी मालिकेसाठी भारतीय संघ :

विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, एमएस धोनी, दिनेश कार्तिक, युज़वेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, सिद्धार्थ कौल, उमेश यादव, दीपक चहर.