कोलकाता : ख्रिस लीन आणि दिनेश कार्तिकच्या जबाबदार फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थानवर सहा विकेट्सनी विजय साजरा केला. या विजयासह कोलकात्याने गुणतालिकेतलं आपलं तिसरं स्थान कायम राखलं.


या सामन्यात राजस्थानने कोलकात्याला विजयासाठी 143 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. कोलकात्याने हे आव्हान बारा चेंडू आणि सहा विकेट्स राखून पार केलं. सलामीवीर ख्रिस लिनने 45 धावांची खेळी केली. तर कर्णधार दिनेश कार्तिकने नाबाद 41 धावांची खेळी केली.

त्याआधी चायनामन कुलदीप यादवच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कोलकात्याने राजस्थानचा डाव 142 धावांत गुंडाळला. कुलदीपने चार षटकांत अवघ्या 20 धावा देताना राजस्थानच्या चार फलंदाजांना माघारी धाडलं. तर आंद्रे रसेल आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

गुणतालिकेत कोलकाता आता तिसऱ्या, तर राजस्थान चौथ्या स्थानावर आहे. उभय संघाचा प्रत्येकी एक सामना बाकी आहे. कोलकात्याने उर्वरित एका सामन्यात विजय मिळवल्यास प्लेऑफचा मार्ग सुकर होईल. मात्र राजस्थानसाठी आता प्लेऑफचा मार्ग कठीण दिसत आहे.